Breaking News

वाराणसीमध्ये कोट्यवधी रुपयांच्या रेल्वे प्रकल्पांची कामे प्रगतीपथावर

नवी दिल्ली, दि. 01 - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या वाराणसीमध्ये कोट्यवधी रुपयांचे रेल्वे प्रकल्प प्रगतीपथावर आहेत. येथील जनतेत  या प्रकल्पांचीच जोरदार चर्चा चालू आहे. महू - गाझीपूर - तरीघाट दरम्यान 51 कि.मी. लांबीचा रेल्वे आणि रस्ते असा एकत्रित उन्नत मार्ग बांधण्याचे काम जोरदार  सुरू आहे, या पूलाच्या फायद्याबाबत राजेश यादव या टॅक्सीचालकाने भरभरून सांगितले. तसेच वाराणसी शहर, सारनाथ आणि मंडूदिह स्थानकांवर उपलब्ध करून  दिल्या जाणार्‍या सोयी सुविधांबाबत पानाचा व्यवसाय करणार्‍या रामब्रिक्ष यांनी सांगितले.
उत्तर रेल्वेचा गोरखपूर विभाग 3 हजार 940 कोटी रुपयांचे सुमारे 53 रेल्वे प्रकल्पांची अंमलबजावणी करत आहे. यामध्ये डेमू निर्मितीच्या कारखान्याचा समावेश  आहे. वाराणसी येथील डिझेल इंजिनाची निर्मिती करणार्‍या कारखान्याचे केंद्र सरकारमुळे पुनरुज्जीवन झाले. अनेक वर्षापासून प्रलंबित असणारे प्रकल्प आता जोमाने  सुरू झाले आहेत, असे विभाग नियंत्रक व्ही. के. श्रीवास्तव यांनी सांगितले. दुहेरी तोंडे असणारी डिझेलची पहिली पाच इंजिने पुढील वर्षीच्या मार्च महिन्यापर्यंत  रुळावर आणण्याचे ध्येय निश्‍चित करण्यात आले असल्याची माहिती मुख्य गुणवत्ता व्यवस्थापक योगेश मोहन यांनी दिली. इलेक्ट्रिक इंजिनांचा वापर वाढवून सध्या  उपलब्ध असलेली डिझेल इंजिने विद्युतीकरण नसणार्‍या भागात याचा वापर करता येणार आहे. यामुळे दुर्गम भागातील मार्ग मुख्य मार्गिकांना जोडता येणे शक्य होणार  आहे आणि 4 हजार 500 अश्‍वशक्तीच्या इंजिनांमुळे परिचालनाची आव्हाने आणि प्रवाशांचा वेळ अशा दोन्ही आघाड्यांवर वापरता येणे शक्य होईल, असे मुख्य  अभिकल्प अभियंता ए. के. सिंग यांनी सांगितले.