Breaking News

शाहू महाराजांकडून जातीभेद निर्मुलन, सामाजिक आरक्षणाची मुर्हूतमेढ-राजेंद्र कलाल

नाशिक, दि. 27 - शासकीय नोकर्‍यांमध्ये सवर्गीयांना आरक्षण आणि जातीभेद निर्मुलन या सारख्या प्रगतशील विचारांची मुहूर्तमेढ देशात सर्वात प्रथम राजर्षी शाहू  महाराज यांनी केली, असे प्रतिपादन प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग, नाशिक मा.श्री.राजेंद्र कलाल यांनी आज येथे केले.
सामाजिक न्याय विभागाच्या सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, नाशिक यांच्या वतीने रविवार, दि. 26 जून 2017 रोजी राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या  जन्मदिना निमित्त सामाजिक न्याय दिन सोहळा आयोजित करण्यात आला होता. यानिमित्ताने सकाळी 10.00 वाजता गंगापूर रस्त्यावरील रावसाहेब थोरात सभागृहात  आयोजित सामाजिक न्याय दिन सोहळयाच्या अध्यक्षस्थानी राजेंद्र कलाल हे होते . त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, नाशिक  देविदास नांदगांवकर, शाहू विचारांचे अभ्यासक प्राध्यापक अशोक सोनवणे , समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य विलास देशमुख व वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक  एस.बी.त्रिभुवन आदी मान्यवर उपस्थित होते.
राजेंद्र कलाल पुढे म्हणाले, सामाजिक समतेचे पहिले पाऊल राजर्षी शाहू महाराज यांनी उचलले. विविध अनिष्ट प्रथा, रुढी, परंपरा विरुध्द महाराजांची आवाज  उठविला. सामाजिक आरक्षणाची देशात खर्‍या अर्थाने मुहूर्तमेढ शाहू महाराजांनी घातली. महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर या  महापुरुषांच्या विचार मूल्यांवर आजच्या सामाजिक न्याय विभागाची वाटचाल सुरू आहे. सामाजिक न्याय विभाग मागासगर्वीय विभागाच्या उन्नतीसाठी अनेक सामाजिक  विकासांच्या योजना राबवत आहे.
प्रा.अशोक सोनवणे यांचे यावेळी  राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे जीवन व कार्य  या विषयावर व्याख्यान झाले. श्री.सोनवणे यावेळी म्हणाले, शाहू महाराजांच्या  प्रेरणेने कोल्हापूरमध्ये त्या काळी सत्यशोधक समाजाची स्थापना झाली. छत्रपती शाहू महाराजांचे शैक्षणिक कार्य लक्षणीय होते. बहुजन समाजात शिक्षणाचा प्रसार  करणं, हे त्यांचे ध्येय होते. त्यांनी निरनिराळया जातींच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे काढली आणि गरजू व होतकरू विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्या सुरू केल्या. प्राथमिक  शिक्षण आपल्या राज्यामध्ये सक्तीचे व मोफत करण्याचा कायदा दक्षिण भारतात पहिल्यांदा शाहू महाराजांनी केला. ही गोष्ट आज आपल्याला विसरून चालणार नाही.
‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ हे सूत्र ध्यानात घेऊन शाहू महाराजांनी राज्यकारभार पाहिला. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय याची फळे सर्व समाजाला चाखता  यावीत म्हणून त्यांनी आपले सिंहासनच पणाला लावले. अज्ञान, अंधश्रद्धा, निरक्षरता सामाजिक दुजाभाव, दारिद्रय यात गुरफटलेल्या समाजाला बाहेर काढण्यासाठी  शाहू महाराजांनी अविरत मेहनत घेतली, असे ही सोनवणे यांनी सांगितले. यावेळी विजाभज आश्रमशाळेमधील इयत्ता 10 वी 12वी मध्ये विशेष गुणवत्ता प्राप्त  विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन दांडेकर यांनी केले.