Breaking News

सिडको क्षेत्र सीसीटीव्ही , शहर सुरक्षा प्रणाली निरीक्षण केंद्र सुरु

नवी मुंबई, दि. 06 - दक्षिण नवी मुंबई परिक्षेत्रात सिडकोतर्फे लावण्यात आलेल्या सीसीटीव्हींचे निरीक्षण केंद्र सिडको भवन येथे सहाव्या मजल्यावर स्थापित  करण्यात आले आहे. आज दिनांक 5 जून 2017 रोजी या केंद्राचे उद्घाटन सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांच्या हस्ते करण्यात  आले. या प्रसंगी सिडकोचे मुख्य दक्षता अधिकारी विनय कारगांवकर, सहव्यवस्थापकीय संचालक राजेंद्र चव्हाण व अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 
या निरिक्षण केंद्रातून दक्षिण नवी मुंबईतील खारघर, कामोठे, कळंबोली, खांदा कॉलनी व नवीन पनवेल या क्षेत्रात लावण्यात आलेल्या एकंदर 294 सीसीटीव्ही  फुटेजची पाहणी करता येणार आहे. सिडको स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत येणार्‍या या प्रकल्पाचे काम विप्रो या यंत्रणेच्या सहकार्याने पूर्ण करण्यात आले आहे.
दक्षिण नवी मुंबईतील सिडको क्षेत्रामध्ये घडणारे गुन्हे व गुन्हेगार यांच्यावर मिळवणे आणि कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित करणे याउद्देशाने ‘सिडको क्षेत्रात सीसीटीव्ही  शहर नियंत्रण प्रकल्प’ या सुरक्षा व संशयितांवर देखरेख ठेवणा-या प्रणालीचे कार्यान्वयनकरण्यात आले आहे. परिसरावर देखरेख ठेवणे हा एवढाच या प्रकल्पाचा  उद्देश नसून इमर्जन्सी रीस्पॉन्स सिस्टम, सेंट्रल अनाउंसमेंट सिस्टम, स्मार्ट नंबर प्लेट सेन्सर अशा वैशिष्ट्यांनी हा परिपूर्ण असा हा प्रकल्प आहे. हा प्रकल्प म्हणजे  स्मार्ट पोलिसींगचा एक भाग आहे.