Breaking News

दोन हजारांच्या बनावट नोटा करणार्‍या टोळीचा पर्दाफाश

बीड, दि. 21 - दोन हजारांच्या नव्या बनावट नोटा छापून त्या वापरणात आणणार्‍या टोळीला आष्टी येथे पोलिसांनी उघडकीस आणले असून दोघांना ताब्यात घेतले  आहे. विशेष म्हणजे घड्याळ दुरुस्ती आणि झेरॉक्स दुकानात नव्या बनावट नोटांची छपाई करण्यात येत होती. दरोडा प्रतिबंधक पथकाने कारवाई करत या आरोपींना  ताब्यात घेत त्यांच्याकडून 2 लाख 15 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
शहानवाज सादेक खान (27 , रा. दारूगल्ली, आष्टी) व भरत मारुती लगडे (रा. लोणी व्यंकनाथ, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर) असे ताब्यात घेतलेल्या आरोपींची  नावे आहेत. आष्टी शहरातील स्टेशन रोडवर एसबीआय बँकेसमोर शहानवाज सादेकचे बॉम्बे वॉच कंपनी अँड झेरॉक्सचे दुकान आहे. या झेरॉक्स मशीनवर बनावट  नोटा तयार करीत असल्याची माहिती बीडच्या दरोडा प्रतिबंधक पथकाला खबर्‍यामार्फत मिळाली होती. यावर पोलिसांनी खात्री करून सोमवारी रात्री साडेनऊ वाजता  धाड टाकत बनावट नोटा बनविण्याचा पर्दाफाश केला. यावेळी जप्त केलेल्या नोटांमध्ये दोन हजार, पाचशे, शंभर, पन्नास व दहा रुपयांच्या नोटांचा समावेश आहे.