Breaking News

शेतकर्‍यांची कर्जमाफी हा उपाय नाही : मोहन भागवत

मुंबई, दि. 27 - शेतकर्‍यांची कर्जमाफी हा काही उपाय नाही. शेतीला चांगेल दिवस यायचे असतील तर भाव मिळाला पाहिजे, असं मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केलं. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या 90 व्या वार्षिक पदग्रहण समारंभाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमासाठी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच राज्यातील शेतकर्‍यांच्या कर्जमाफीची घोषणा केली. त्यानंतर विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी कर्जमाफीवरुन मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. शिवाय शेतकरी कर्जमाफीसाठी स्थापन झालेल्या सुकाणू समितीनेही मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेल्या कर्जमाफीवर नाराजी व्यक्त केली होती. या सर्व पार्श्‍वभूमीवर सरसंघचालक मोहन भागवत यांनी भाष्य केल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरु आहे.
मोहन भागवत म्हणाले की, शेतकर्‍यांची कर्जमाफी म्हणजे, शेती समस्यांवरचं उत्तर नाही. तर शेती फायद्याची व्हावी यासाठी प्रयत्न करावे लागतील. शेती फायद्यात चालावी यासाठी उद्योग व व्यापार जगताने शेतकर्‍यांना प्रशिक्षण द्यायला हवे. तसेच शेतीमालाला योग्य दर व हमी भाव मिळाल्याशिवाय शेतकर्‍यांची समस्या सुटणार नाही, असं त्यांनी सांगितल. विशेष म्हणजे, आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर गणेश मंडळांकडून उत्सव काळात डीजे लावण्यावरुन मंडळांच्या कार्यकर्त्यांचे कान उपटले. गणेश मंडळांनी ‘डीजे’ पेक्षा समाजप्रबोधन व समाजहिताकडे अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचं भागवत यांनी सांगितलं.