Breaking News

जीएसटीच्या धाकाने नगरच्या एमआयडीसीत कंपन्यांनी उत्पादन थांबविले

अहमदनगर, दि. 27 - शनिवार पासून संपूर्ण देशभरात जीएसटी ही नवीन कर प्रणाली लागू होणार आहे. नवीन कर प्रणाली मुळे कोणताही तोटा होणार नसला तरी  कोणत्या वस्तूवर नेमका किती जीएसटी लागेल या बाबत मोठी साशंकता आहे.तसेच कंपन्यांकडे साठा असलेल्या वस्तूंवर पुढील 1 महिन्याच्या आत जीएसटी भरावा  लागणार असल्याने नगर एमआयडीसी तसेच औद्योगिक वसाहती मधील सर्वच मोठ्या कंपन्यांनी रविवार(25 जून)पासून उत्पादन करणे बंद केले असून कच्च्या  मालाची खरेदी देखील थांबविण्यात आली आहे.उद्योग क्षेत्र बंद झाल्याने कोट्यवधी रूपयांची उलाढाल अक्षरश: ठप्प झाली आहे.दरम्यान सर्व कंपन्यांमधील व्यवहार  5 जुलै नंतरच सरू होण्याची चिन्हे आहेत.
30 जूनच्या मध्यरात्री पासूनच देशभर जीएसटी ही नवीन कर प्रणाली लागू केली जाणार आहे.सध्या जीएसटी च्या नावनोंदणी साठी उद्योजकांची धावपळ सुरू  आहे.जीएसटी मधील तरतुदींनुसार कंपन्यांना आपल्या रोजच्या कारभारात काही बदल करावे लागणार आहेत.त्यादृष्टीने बहुतेक कंपन्यांनी सद्यस्थितीत कंपनीत शिल्लक  असलेला स्टॉक,वस्तूंची यादी,वस्तूंचे दर निश्‍चित करणे,उत्पादित मालाची यादी तयार करून संगणकात त्याची नोंद घेणे अशी कामे कंपन्यांमध्ये सुरू आहेत. 30  जूनच्या रात्री नंतर उत्पादित होणार्या मालावर जीएसटी लागू होणार आहे.त्यापूर्वी कंपनी कडे शिल्लक असलेल्या व कंपनीत साठा केलेल्या मालावर पुढील एक  महिन्याच्या आत कर भरावा लागणार आहे.या सर्व पार्श्‍वभूमीवर अहमदनमगर एमआयडीसी व औद्योगिक वसाहतीमधील सर्वच कंपन्यांनी रविवारपासून उत्पादन करणे  थांबविले आहे.तसेच कच्च्या मालाची खरेदी देखील बंद करण्यात आली आहे.नवीन कर प्रणालीमुळे उद्योगांना कोणतेही नुकसान होणार नसले तरी कोणत्या वस्तूवर  नेमका किती कर लागणार याबाबत अद्यापही मोठा संभ्रम आहे.त्यामुळेच उद्योजकांनी देखील सावध भूमिका घेत उत्पादन बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.नगर  शहराच्या औद्योगिक परिसरातील उद्योग तात्पुरते का होईना बंद झाल्याने कोट्यवधी रुपयांची उलाढाल सध्या पूर्णपणे ठप्प झाल्याचे दिसत आहे.जीएसटी कराबाबत  योग्य माहिती उपलब्ध होताच सुमारे 5 जुलै नंतर कारखाने पुन्हा सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.