Breaking News

जिल्हा प्रो कबड्डी लिगमध्ये बालाजी ट्रस्टचा संघ विजेता

सातारा, दि. 24 (प्रतिनिधी) : येथील श्रीकृष्ण क्रीडा मंडळाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हा प्रो कबड्डी लिगच्या अंतिम सामन्यात बालाजी चॅरिटेबल ट्रस्टच्या संघाने शेखर गोरे यांच्या माणदेशी संघावर 17 गुणांनी विजय मिळवत मानाचा श्रीकृष्ण चषक व रोख पारितोषिक पटकावले. नगराध्यक्षा माधवी कदम यांच्या हस्ते विजेत्या संघाला चषक व रोख रक्कम प्रदान करण्यात आली. मालिकावीर म्हणून बालाजीच्या संघातील सलमान शेख याला गौरवण्यात आले. 
येथील 97 वर्षाची परंपरा लाभलेल्या श्रीकृष्ण क्रीडा मंडळाच्यावतीने सातारा जिल्हा प्रो कबड्डी लीग स्पर्धा नुकत्याच घेण्यात आल्या.
यावेळी अंतिम सामना राजेंद्र चोरगे यांच्या बालाजी विरुध्द शेखर गोरे यांचा माणदेशीच्या संघात रंगला. अपेक्षेप्रमाणे अतिशय उच्च प्रतीचा खेळ करत बालाजीच्या संघाने शेखर गोरेंच्या माणदेशी संघाला धुळ चारत सामना तब्बल 17 गुणांनी जिंकला. बालाजीच्या संघातील स्टार खेळाडू सलमान शेख याने बहारदार खेळाचे प्रदर्शन केले. त्याला मालिकावीर घोषित करण्यात आले.
तिसर्‍या क्रमांकाचा मानकरी हिरा संघ ठरला. विजेत्या बालाजी संघाला नगराध्यक्षा माधवी कदम यांच्या हस्ते पारितोषिक देवून गौरवण्यात आले. उपविजेता संघ ठरलेल्या शेखर गोरेंच्या माणदेशीलाही पारितोषिक तसेच हिरा संघालाही पारितोषिक देण्यात आले. यावेळी बांधकाम सभापती किशोर शिंदे, मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रताप पवार, माजी नगरसेवक संजय शिंदे, सचिन गोसावी, वंदना पवार, बालाजीचे संघ मालक राजेंद्र चोरगे यांच्यासह आठ संघाचे मालक उपस्थित होते.