Breaking News

कष्टकरी समाजाने स्वकष्टातून स्वत:ला व समाजालाही घडविले- ना. विखे

संगमनेर, दि. 30 -  अत्यंत साधारण परिस्थीती असलेल्या कष्टकरी समाजाने सामाजिक संस्थेच्या माध्यमातून स्वत:ला व समाजालाही घडविले. दरवर्षी राज्यस्तरीय चित्रकला  स्पर्धेसारखा उपक्रमातून विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांचा विकास करणार्‍या बालाजी प्रतिष्ठानच्या कार्याचा, आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या इतर संस्थांनी आदर्श घ्यावा असे प्रतिपादन राज्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
निमगावजाळी येथील बक्षीस वितरण समारंभाप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जेष्ठ कार्यकर्ते बाळासाहेब डेंगळे होते. या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्या अ‍ॅड. रोहिणी निघुते, पंचायत समिती सदस्या दिपाली डेंगळे, संस्थेचे अध्यक्ष तुकाराम पवार, प्रभारी तहसिलदार प्रियंका आंबेकर, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, सरुनाथ उंबरकर, विनायक बालोटे, माधवराव गायकवाड, भगवान इलग, लक्ष्मण पवार, जनार्धन पवार, सरपंच सरला डेंगळे, उपसरपंच अमोल जोंधळे, नंदू राठी, ठकाजी थेटे, सुजाता थेटे, ज्योती धनवटे, साहेबराव वलवे, विजय डेंगळे, रामकृष्ण लंगोटे  आदी मान्यवर उपस्थित होते.
ना. विखे म्हणाले,  निमगावजाळी मधील बालाजी ग्रामीण कला व क्रीडा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केलेल्या राज्यस्तरिय चित्रकला स्पर्धेने आपले वेगळे स्थान निर्माण करण्यात यश मिळविले आहे. या कष्टकरी समाजाने स्वकष्टातून स्वःतला व समाजालाही घडविले. मोठ्या धाडसाने ते हा आगळा वेगळा उपक्रम दरवर्षी साजरा करतात हे कौतुकास्पद आहे. शिक्षणक्षेत्रातील डीजीटलायझेशनमुळे वेगाने बदलणार्‍या घडामोडींवर भाष्य करतांना त्यांनी, आगामी काळात वह्या, पुस्तकांची आवश्यकता भासणार नसल्याचे व्यक्त करुन, विद्यार्थी, शिक्षक व पालकांनी या प्रवाहात सामील होण्यासाठी बदलण्याची आवश्यकता आहे.  उत्तम शिक्षण,  ज्ञानदान, शैक्षणिक व भौतिक विकासासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न केल्यास सुसंस्कृत पिढी निर्माण होईल असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.
या प्रसंगी राज्यस्तरिय चित्रकला स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचा करंडक ओम गुरुदेव इंग्लिश मिडीयम स्कूल, कोकमठाण यांनी  तर द्वितीय क्रमांक त्रिमुर्ती पब्लिक स्कूल, नेवासे या विद्यालयांनी मिळवला. प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना रोख  रक्कम, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देवून विखे पाटील यांच्या हस्ते गौरविण्यात आले. तसेच कला शिक्षकांना कलाश्री, कलारत्न, तसेच उपक्रमशिल मुख्याध्यापकांना कलाभूषण व कलाप्रेमी या पुरस्काराने गौरविण्यात आले.
प्रास्ताविक संस्थेचे सचिव गंगाराम धनवटे  यांनी केले. सुत्रसंचालन प्रा. दिनेश भाने यांनी तर आभार दिपक डेंगळे यांनी मानले.कार्यक्रमास विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.