Breaking News

घारगावसह पठार भागातील शेतकर्‍यांचा कर्ज न भरण्याचा ग्रामसभेत ठराव पारीत

संगमनेर, दि. 30 -  शासनाने जाहीर केलेल्या कर्ज माफीला तालुक्यातील पठार भागातील कोणताच शेतकरी पात्र ठरत नसल्याने घारगावसह इतर गावांतील शेतकरी व ग्रामस्थांनी कर्ज न भरण्याचा ठराव पारीत केला आहे. यामुळे शेतकर्‍यांचे सरसकट कर्ज माफी करावी अशी मागणी शेतकरी वर्गासह ग्रामस्थांनी केली आहे.
शासनाने जाहीर केलेल्या कर्ज माफीचा फटका आता नियमीत कर्जफेड करणार्‍या शेतकर्‍यांना बसत आहे. बँक व सोसायट्यांचे कर्ज फेडण्यासाठी शेतकर्‍यांनी नातेवाईक व सावकारांकडून व्याजाने पैसे जमा करुन कर्ज नियमीत केले. मात्र अशा शेतकर्‍यांना शासनाचा कर्जमाफीचा फटका बसत आहे. नियमीत कर्ज फेड करुन आम्ही पाप केले का? असा सवाल शेतकरी करीत आहे. शेती मालाला हमी भाव नसल्याने हा व्यवसाय सध्या धोक्यात आला आहे. शासन कुठलेही ठोस पावले उचलत नसल्याने शेतकरी वर्ग दुहेरी संकटात सापडला आहे. यातच कर्ज माफीच्या जाचक अटींचा फटका अनेक शेतकर्‍यांना बसणार असल्याने शेतकरी वर्ग पुन्हा रस्त्यावर उतरणार असल्याचे चित्र दिसत आहे.
संगमनेर तालुक्यातील पठार भागातील अनेक गावातील शेतकर्‍यांना जाचक अटीमुळे कर्ज माफीपासून वंचित रहावे लागणार आहे. यासाठी काल गुरुवारी घारगावसह इतर गावातील शेतकरी व ग्रामस्थांनी कर्ज माफी झालीच पाहिजे अशा घोषणा देत शासनाचा निषेध नोंदविला. सरसकट कर्ज माफी मिळावी, यासाठी सर्व गावच्या ग्रामपंचायतींमध्ये एकमताने ठराव पारीत करण्यात आले. कर्ज भरणार नसल्याची भूमिकाही त्यांनी स्पष्ट केली. बँक, सोसायट्यांनी कर्ज भरण्यासाठी शेतकर्‍यांना वेठीस धरले तर न्यायालयीन पातळीवर संगमनेर बार असोसिएशन त्यांच्या पाठीशी उभी राहील असे आश्‍वासन अध्यक्ष अ‍ॅड. सुहास आहेर यांनी यावेळी दिले आहे. याप्रसंगी शिवेसनेचे तालुकाध्यक्ष जनार्दन आहेर, घारगावचे उपसरपंच संदीप आहेर आदींसह शेतकरी वर्ग व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शासनाने केलेली कर्जमाफी आम्हाला मान्य नाही, सर्वच शेतकर्‍यांना सरसकट कर्ज माफी करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.