पावत्या सादर न केल्याने मिळत नाही तुरीचे चुकारे!
खरेदी-विक्री संस्थेकडुन शेतकर्यांना उडवाउडवीचे उत्तरे; स्वाभिमानीचे निवेदन
बुलडाणा, दि. 21 - एक ते दोन महिन्यांचा कालावधी उलटुनही शेतकर्यांना चुकारे मिळाले नाहीत. तर खरेदी-विक्री संस्थेने तुर खरेदी केली परंतु वेअर हाऊसला तुर जमा केल्याच्या पावत्या जिल्हा मार्केटिंग कार्यालयाला सादर न केल्याने शेतकर्यांना तुरीचे चुकारे मिळण्यास विलंब लागत असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाउपाध्यक्ष विनायक सरनाईक यांच्यासह शेतकर्यांनी चिखली तहसिलदार गायकवाड यांची 19 जून रोजी भेट घेऊन यासंदर्भात चर्चा करून यावर योग्य उपायोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.शेतकर्यांनी चार पैसे शिल्लक मिळतील या आशेवर आपली तुर नाफेड केंद्राला दिली आहे. तर पंधरा ते वीस दिवस बारदाना नसल्याने तुर खरेदी बंद राहिली तर तुर मोजमाप करवून घेण्यासाठी एक ते दिड महिन्याच्या प्रतिक्षेनंतर शेतकर्यांचे तुरीचे मोजमाप करण्यात आले. मात्र महिन्याचा कालावधी उलटूनही शेतकरी काटापट्या व चुकारे मिळेल या आशेने खरेदी-विक्री संस्थेकडे वारंवार चकरा मारीत आहेत. तर खरेदी-विक्री संस्थेकडुन पैसे नाहीत, इतकेच आलेत असे उडवाउडवीचे उत्तरे देऊन वेळ काढु धोरण अवलंबवत असल्याने व काटापट्या, चुकारे मिळत नसल्याने काही शेतकर्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे चिखली कार्यालय गाठुन याबाबत माहिती दिली असता सदर बाब गांभिर्याने घेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाउपाध्यक्ष विनायक सरनाईक यांनी जिल्हामार्केटिंग अधिकारी शिंगणे यांना याबाबत भ्रमणध्वनीव्दारे विचारणा केली असता आमच्याकडे जिल्ह्यात खरेदी केलेल्या तुरीची 40ते 50 कोटी रुपये शासनाकडून आले आहे. तर चिखली तालुक्यातील आठ हजार क्विंटल तुर खरेदीचे पैसे आमच्याकडे उपलब्ध आहेत परंतु खरेदी-विक्री संस्थेच्या व्यवस्थापकाने तुर खरेदी केली परंतु तुर वेअर हाऊसला साठवली असल्याच्या पावत्या सादर न केल्याने व अधिक रक्कमेची मागणी केली नसल्याने पैसे टाकता येत नाहीत, अशी माहिती देवून यामुळे शेतकर्यांना चुकारे मिळत नसल्याचे त्यांनी सांगितले. तर सदर बाबी संदर्भात तुर खरेदी सनियंत्रण समितीचे अध्यक्ष तहसिलदार गायकवाड यांची भेट घेऊन संबंधीतांना याबाबत सुचना करुन योग्य उपायोजना कराव्यात जेनेकरून चुकारे मिळाले तर शेतकर्यांना पेरणीच्या दिवसात दिलासा मिळेल अशी मागणी निवेदनाव्दारे करण्यात आली. तर याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. सदर बाब गांभिर्याने घेऊन तहसिलदार यांनी खरेदी-विक्री संस्थेचे व्यवस्थापक यांची चांगलीच कानउघाडणी केली. तर डोंगरदिवे यांनी तीन हजार क्विंटल तुरीच्या पावत्या तात्काळ जिल्हामार्केटिग कार्यालयाला सादर करणार असल्याचे सांगितले. यावरून असे स्पष्ट होते की शेतकर्यांच्या तुरीचे मोजमाप होताच जर तुर वेअर हाऊसला साठवली असती तर शेतकर्यांना आज बि-बियाणे घेण्यासाठी पैसे मिळाले असते आणि शेतकरी पेरणीपासून वंचित राहिला नसता.तर यावरून खरेदी विक्री संस्थेचा कामचुकारपणा भोंगळ कारभार दिसून येत आहे. तर तहसिलदार यांनी तुर पट्या त्वरीत देऊन चुकारे त्वरीत देण्याच्या सुचना करून अहवाल सदर करण्याचे निर्देश डोंगरदिवे व संबंधीत अधिकारी यांना दिले. मागण्यांची पुर्तता न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. यावेळी विनायक सरनाईक, दिपक सुरडकर, नितिन राजपुत, विलास तायडे, भरत जोगदंडे, अनिल चौहाण, राजु शेटे, ज्ञानेश्वर थुट्टे, एकनाथ माळेकर, गणेश गायकवाड, सुधाकर तायडे, बबन तायडे यांसह शेतकरी उपस्थित होते.
