चॅम्पियन्स करंडक जिंकल्यामुळे पाकिस्तान क्रमवारीत 6 व्या स्थानी
दुबई, दि. 21 - चॅम्पियन्स करंडकावर आपले नाव कोरल्यामुळे पाकिस्तानच्या संघाने जागतिक एकदिवसीय क्रमवारीत दोन स्थानांची झेप घेत 6वे स्थान पटकावले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने आज जागतिक एकदिवसीय क्रमवारी जाहीर केली. या यादीत पाकिस्तानने 4 गुणांची कमाई करत 95 गुणांसह श्रीलंका आणि बांगलादेश या संघांना एक-एक स्थान खाली ढकलले. या कामगिरीमुळे पाकिस्तानला 2019च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी थेट प्रवेश मिळण्याची शक्यता वाढली असून 8व्या स्थानी फेकल्या गेलेल्या बांगलादेशला धोका निर्माण झाला आहे. 30 सप्टेंबर रोजी एकदिवसीय क्रमवारीतील पहिल्या आठ संघांना विश्वचषक स्पर्धेत थेट प्रवेश मिळणार आहे, तर उर्वरित संघांना पात्रता फेरीला सामोरे जावे लागणार आहे.
