Breaking News

बार्टीतील प्रकल्प अधिकार्यावर गुन्हा दाखल, 52 लाख रुपयांचा अपहार

पुणे, दि. 01 - पीएचडी आणि एमफील अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना संशोधनासाठी बाटीतर्फे दिल्या जाणार्या लॅपटॉप व्यवहारात 51 लाख 68 हजार 437 रुपयांचा  अपहार केल्याप्रकरणी प्रकल्प संचालकावर कोरेगांव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राहुल सिद्धार्थ रणवीर (रा. शिववंदन कॉम्प्लेक्स, भेकराई नगर, हडपसर) असे गुन्हा दाखल झालेल्या प्रकल्प संचालकांचे नाव आहे. याप्रकरणी बार्टीच्या प्रभारी  निबंधक सविता नलावडे (वय 46) यांनी फिर्याद दिली आहे. गुन्हा दाखल झालेला राहुल रणवीर हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेत (बार्टी)  माहिती व तंत्रज्ञान विभागात प्रकल्प अधिकारी होता. तो सध्या येरवडा येथील समाजकल्याणच्या कार्यालयात कार्यरत आहे.
बार्टीतर्फे राज्यातील मगास प्रवर्गातील निवडक विद्यार्थ्यांना पीएचडी व एमफील अभ्यासक्रमाच्या संशोधनासाठी लॅपटॉप देण्यात येतात. बार्टीत कार्यरत असताना  रणवीर याने जानेवारी 2015 ते 18 जानेवारी 2017 या कालावधीत निवडक विद्यार्थ्यांना देण्यासाठी असलेल्या 51 लाख 68 हजार 437 रुपये किमतीच्या एसर  कंपनीच्या 103 नवीन लॅपटॉपची परस्पर विल्हेवाट लावून सदर रकमेचा अपहार केला. तसेच 2015 मध्ये निवड झालेल्या 12 विद्यार्थ्यांना एसर कंपनीचे नवीन  लॉपटॉप देण्याऐवजी जुने लॉपटॉप देवून बार्टीची फसवणुक केली. ही बाब बार्टीच्या प्रभारी निबंधक नलावडे यांच्या निदर्शनास आल्यानंतर चौकशी करून त्यांनी  रणवीर याच्या विरोधात कोरेगांव पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दिली. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जी.जी. पवार करीत आहेत.