Breaking News

वादळी वार्‍यासह पाऊस; 40 गावांचा वीज पुरवठा खंडीत

बुलडाणा, दि. 06 - जिल्हाभरात वादळी वार्‍यासह जोरदार पावसाने शनिवारी रात्री हजेरी लावली. विजेचा कडकडाट व सुसाट वार्‍यामुळे अनेक झाडे कोसळून पडली. यातच बुलडाणा तालुक्यातील पाडळी व हतेडी येथील 33 के.व्ही. सब स्टेशनच्या तारांवर तांत्रिक बिघाड आल्यामुळे मागील 24 तासापासून या दोन्ही सबस्टेशनवर अवलंबून असणारे सुमारे 40 गावे अंधारात आहेत. कालच्या पावसानंतर बुलडाणा ते पाडळी व देऊळघाट ते हतेडी या मार्गावरील विद्युत तारांवर कोठे फॉल्ट आला आहे, हे शोधण्याचे काम दोन्ही सबस्टेशनचे कर्मचारी करीत आहेत. मात्र, मागील 20 तासांपासून खंडित वीज पुरवठयामुळे हजारो लोकांचे हाल होत आहेत.
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडून बुलडाणा तालुक्यात अनेक ठिकाणी 33 के.व्ही.चे सबस्टेशन उभारण्यात आले आहे. ग्राहकांना चांगली सुविधा मिळावी, हा उद्देश यामागील असून, पाडळी व हतेडी येथेसुद्धा 33 के.व्ही.चे सबस्टेशन आहे. अनेक वर्षांपासून या स्टेशनला बुलडाण्याहून देऊळघाटपर्यंत व देऊळघाटपासून एक लाइन पाडळीला व दुसरी लाइन हतेडी सबस्टेशनला जाते. शनिवारी पडलेला पाऊस व वादळी वार्‍यामुळे या लाइनच्या खाबांवरील इन्सुलेटर (चिनी मातीचे वीजरोधक) बर्‍याच  ठिकाणी फुटल्यामुळे वीज पुरवठा 3 जूनच्या सायंकाळपासून खंडित झालेला आहे.पाडळी व हतेडी सबस्टेशनवर अवलंबूनअसणारे 40 गावे रात्रीपासून अंधारात आहेत. तिकडे पाडळी व हतेडी सबस्टेशनकडून सर्व वायरमन मुख्य 33 केव्हीच्या लाईनवर फिरवून खांबावरच्या इन्सुलेटर दुरुस्ती करीत आहेत. आजपर्यंत या विविध ठिकाणी 8 इन्सुलेटर खराब अवस्थेत आढळून आले. सध्या मुस्लीम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू आहे. या गावांमध्ये काल सायंकाळपासून वीज नसल्यामुळे मुस्लीम बांधवांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. पाडळी व हतेडी सबस्टेशन अंतर्गत येणार्‍या गावांच्या मार्गावरील विद्युत लाइन दुरुस्तीचे काम सुरू आहे. शिवाय वादळामुळे निकामी झालेल्या खांबावर नवीन इन्सुलेटर लावण्यात येत आहे.