Breaking News

इस्रोचा आणखी एक भरारी, एकाच वेळी 31 उपग्रह लॉन्च

श्रीहरीकोटा, दि. 23 - भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने  आज पुन्हा एकदा भारताची मान जगभरात अभिमानाने उंचावली. इस्रोने आज श्रीहरीकोटा इथून  30 नॅनो उपग्रहांसोबत कार्टोसॅट 2 उपग्रहाचं प्रक्षेपण केलं. पीएसएलव्ही सी38 प्रक्षेपकातूने हे उपग्रह सोडण्यात आलं. इस्रोचे संचालक एएस किरण कुमार यावेळी  उपस्थित होते. उपग्रहांच्या प्रक्षेपणानंतर त्यांनी वैज्ञानिकांना शुभेच्छा दिल्या. या लॉन्चसह भारताच्या एकूण अंतराळ मोहीमेची संख्या 90 झाली आहे.
पृथ्वीवर नजर ठेवण्यासाठी लॉन्च केलेल्या 712 किलोग्राम वजनाच्या कार्टोसॅट-2 उपग्रहासोबत सुमारे 243 किलोग्राम वजनाच्या 30 नॅनो उपग्रहाचं एकाच वेळी  प्रक्षेपण झालं. सर्व उपग्रहांचं एकूण वजन 955 किलोग्राम आहे. या उपग्रहांमध्ये भारत, ऑस्ट्रिया, बेल्जियम, चिली, चेक प्रजासत्ताक, फिनलँड, फ्रान्स, जर्मनी,  इटली, जपान, ब्रिटन, अमेरिकेसह 14 देशांचे उपग्रह आहेत. 30 नॅनो उपग्रहांमध्ये 29 परदेशी आणि एक भारताचा उपग्रह आहे. अंतराळ कक्षेत स्थिरावल्यानंतर सर्व  उपग्रह सुरु करण्याचा इस्रोचा उद्देश आहे. मात्र अंतराळातील कचर्‍यापासून बचाव करण्याचं आव्हानही इस्रोसमोर आहे.