Breaking News

जीएसटी’ लोकार्पणासाठी 30 जूनच्या रात्री संसदेचे विशेष अधिवेशन - जेटली

नवी दिल्ली, दि. 21 - वस्तू व सेवा कर लागू 1 जुलैपासून देशभरात लागू केला जाणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर 30 जूनच्या रात्री संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात विशेष  अधिवेशन बोलावले जाणार आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी या नव्या कर प्रणालीचे लोकार्पण करतील, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज येथे  सांगितली. 
30 जून रोजी रात्री 11 वाजता हे अधिवेशन सुरू होऊन मध्यरात्री 12.10 वाजेपर्यंत चालणार आहे. या वेळी उपराष्ट्रपती हामिद अन्सारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी,  लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, एच.डी. देवेगौडा आदी व्यासपीठावर उपस्थित असणार आहेत. याशिवाय, खासदार, मुख्यमंत्री  व सर्व राज्यांच्या अर्थमंत्र्यांनाही आमंत्रित करण्यात आले आहे. या प्रसंगी राष्ट्रपती, पंतप्रधान व केंद्रीय अर्थमंत्री संबोधित करतील. दोन्ही सभागृहांचे हे संयुक्त सत्र  असणार आहे, असेही जेटली यांनी सांगितले. या वेळी सभागृहात नव्या प्रणालीच्या वैशिष्ट्यांवर आधारित तयार केलेला लघुपटही दाखवला जाणार आहे. केरळ व  जम्मू-काश्मीर सोडून अन्य सर्व राज्यांनी हा कायदा मंजूर केला आहे. केरळमध्ये या आठवडाभरात हा कायदा मंजूर केला जाईल, असा विश्‍वास जेटली यांनी व्यक्त  केला.