Breaking News

शेतकर्‍यांना मिळणार 30 हजार कोटींची कर्जमाफी : मधू चव्हाण


रत्नागिरी,दि. 11 : शेतमालाला हमी भाव देताना त्याचा दर वाढला तर सामान्य ग्राहकांना भुर्दंड बसेल, हे एक दुष्टचक्र आहे. ते भेदण्यासाठी भाजप शासनाने फक्त कर्जमाफी नव्हे तर शेतकर्‍यांना बळ देण्यासाठी पीकविमा, जलशिवार योजना, शेततळे, मातीपरीक्षण अशा विविध योजना राबविण्याचे ठरविले आहे. दिवाळीपूर्वी 30 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात येणार आहे. मध्यावधी निवडणुकांची शक्यता नाही, असे सांगत सरकार स्थिर असल्याचे संकेत भाजपचे प्रवक्ते मधुकर चव्हाण यांनी येथे पत्रकार परिषदेत दिले.
भाजप जिल्हा संपर्क कार्यालयात आज सायंकाळी पत्रकार परिषद झाली. या वेळी भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य सचिन वहाळकर, तालुकाध्यक्ष सतीश शेवडे, सरचिटणीस दादा दळी, शहराध्यक्ष प्रशांत डिंगणकर, नगरसेवक मुन्ना चवंडे आदी, चंद्रकांत लिंगायत उपस्थित होते. शिवसेना सत्तेत भाजपसोबत आहे. कर्जमाफी होणार हे माहीत असूनही ते आंदोलन करत आहेत, असे विचारता, मधू चव्हाण यांनी ‘हा प्रश्‍न त्यांना विचारा’, असे सांगितले. कर्जमाफीचा विषय शिवसेनेला कळेल, असे सांगितले. काँग्रेसने बँकांच्या विलिनीकरणाच्या काळात आपापल्या नातेवाइकांना कर्ज दिले, जे कधीच फेडले गेले नाही व बँका लुटल्या. प्रत्येक वेळी स्वतःच्या भवितव्याचा आणि निवडणुकीत विजयाचा विचार काँग्रेसने केल्याची टीका मधू चव्हाण यांनी केली. याउलट पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप देशाच्या व पुढच्या पिढीच्या भवितव्याचा विचार करतात. त्यामुळे आगामी निवडणुकांत भाजपला सत्ता मिळेल, असे चव्हाण यांनी सांगितले.केंद्रातील भाजपप्रणीत सरकारला तीन वर्षे पूर्ण झाल्याबद्दल शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवल्या जात आहेत. याचा आढावा चव्हाण यांनी आज भाजप कार्यालयात घेतला आणि पत्रकार परिषदेत भाजप सरकार कोणत्या योजना राबवत आहे आणि किती जणांना लाभ मिळाला, हे सांगितले. भाजप सरकार जनताभिमुख
असल्याने पुढील निवडणुकीत भाजपला लोक स्वीकारतील असे सांगत पुढचे सरकार भाजपचेच असेल असे संकेत दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रातील अन्य मंत्र्यावर तीन वर्षांत एकही भ्रष्टाचाराचा आरोप झाला नाही, असे अभिमानाने सांगितले. लोक अनेकदा कुठे आहेत ‘अच्छे दिन’ असे म्हणत टिंगलटवाळी उडवतात. पण खरोखरच गरजूंना योजनांचा लाभ देऊन भाजपने सामान्य लोकांच्या गरजा योग्य प्रकारे भागवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केल्याचे सांगितले. चव्हाण म्हणाले की, खरोखरच ज्याला गरज आहे, अशांचीच कर्जमाफी होईल. यासाठी समिती नेमली आहे. गेल्यावेळच्या कर्जमाफीमध्ये धनिकांचीही कर्जमाफी झाली. शरद पवारांनी स्वामीनाथन आयोगातील तरतुदी स्वीकारल्या पण हमी भावाची अट स्वीकारली नाही, याचे उत्तर द्यावे, असेही ते म्हणाले. पवारांनी नेहमी धनिक शेतकर्‍यांचाच विचार केला. जो कमी उत्पादन घेतो व गरीब शेतकर्यांगसाठी काँग्रेसने काही केले नाही, अशी टीका करताना भाजपने कर्जमाफी व अन्य योजनांची माहिती दिली. शिवसेनेचे संजय राऊत यांनी मध्यावधी निवडणुकांची शक्यता व्यक्त केली होती. त्यासंदर्भात चव्हाण यांनी सांगितले की, पक्षप्रमुख ठाकरे किंवा शिवसेनेच्या सुरवातीपासून ज्यांनी पक्षासाठी कष्ट घेतले
असे मनोहर जोशी आदी काही म्हणाले, तर त्याची आमचे वरिष्ठ दखल घेतील. मात्र राऊत यांच्या विधानाला कवडीमोलही किंमत नाही. भाजपने जनताभिमुख शासन राबवल्याने पुढील विधानसभा निवडणुकीत भाजपला जनता स्वीकारेल, असेही सांगत चव्हाण यांनी भाजपने स्वबळावर सत्ता स्थापनेसाठी सज्ज असल्याचे सूचित केले.