Breaking News

अद्याप 2 हजार कोटीच्या जुन्या नोटा बँकांमध्ये पडून - शरद पवार


पुणे,दि.26 : नोटाबंदी लागू झाल्यानंतर प्रथम चार दिवस जिल्हा सहकारी बँकांमध्ये रक्कम जमा झाली. मात्र, त्यानंतर या बँकांनी जुने चलन स्वीकारू नये, असे आदेश देण्यात आले. त्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडे वारंवार मागणी केल्यानंतर काही प्रमाणात पैसे स्वीकारण्यात आले. मात्र अद्याप 2 हजार कोटीच्या जुन्या नोटा बँकांमध्ये पडून असून यामुळे बँकांना आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले. नोटबंदीच्या निर्णयानंतर पहिल्या काही दिवसात 155 जिल्हा मध्यवर्ती बँकांमध्ये 8000 कोटींच्या रकमेच्या जुन्या नोटा जमा झाल्या. मात्र, त्या स्वीकारण्यास सरकारने असमर्थता दाखवली. त्यानंतर अर्थमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर काही नोटा बदलून दिल्या. मात्र, तरी देखील त्यानंतर 2 हजार 200 कोटींच्या नोटा बदलून देण्यात आल्या. त्यामुळे अद्याप दोन हजार कोटींच्या नोटा बँकांमध्ये पडून आहेत. मागील आठवड्यात केंद्र सरकारने नोटा बदलून द्याव्या, असे आदेश काढले. मात्र, कायद्यातील काही अडचणींमुळे या नोटा बदलून देण्यास आरबीआयने नकार दिला आहे. त्यामुळे जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकांच्या व्याजाचे नुकसान होत आहे. एखाद्या पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेला 290 कोटींचा तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे या नोटा बदलून घेण्यासाठी सरकारने कायद्यात बदल करावा आणि रिझर्व्ह बँकेला नोटा स्वीकारण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणीही पवारांनी केली.