Breaking News

वटसावित्री पौर्णिमेनिमीत्त संगमनेरात 2111 वटवृक्षांचे रोपण

संगमनेर, दि. 08 - दंडकारण्य अभियानाअंतर्गत वटसावित्री पौर्णिमेनिमीत्त संगमनेर तालुक्यातील प्रत्येक गावात व वाडीवस्तीवर  गुरुवारी 2111 वटवृक्षांचे रोपन करण्यात येणार असून त्यांच्या संवर्धनाची जबाबदारी स्थानिक नागरिकांवर देण्यात येणार असल्याची माहिती प्रकल्प प्रमुख सौ. दुर्गाताई तांबे यांनी दिली. 
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून सुरु झालेल्या या अभियानाचे हे 12 वे वर्ष आहे. आमदार बाळासाहेब थोरात, आमदार डॉ सुधीर तांबे, प्रकल्पप्रमुख सौ. दुर्गाताई तांबे व सौ.कांचनताई थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान लोकचळवळ झाले आहे. वृक्षसंस्कृती जोपासणार्‍या या चळवळीने देशपातळीवर लौकिक निर्माण केला. प्रत्येक नागरिकाचा सहभाग हा या चळवळीचे यश आहे. यामुळे वृक्षतोड टळली असून उजाड बोडखी डोंगरे झाडांनी हिरवीगार दिसू लागली आहे. भारतीय स्त्रीयांच्या जिवनात वटवृक्षाला विशेष महत्व  आहे. पुराणात वटवृक्षाला संसारवृक्षाचे प्रतिक मानले जाते. वडाचे झाड  अत्यंत औषधी व आरोग्यासाठी फलदायी आहे. आयुर्वेदामध्येही वटवृक्ष, रुई, उंबर, पिंपळ या झाडांना देव वृक्ष म्हणून संबोधले आहे. ही वृक्ष जास्त प्रमाणात ऑक्सिजन निर्माण करतात. म्हणून असा हा वटवृक्ष प्रत्येक गावात व वाडीवस्तीवर असावा यासाठी दंडकारण्य अभियान समितीच्या वतीने प्रत्येक गाव व वाडीवस्तीसाठी 2111 वटवृक्षाचे रोपे देण्यात येणार आहे.
वटपौर्णिमेच्या दिवशी महिलांच्या हस्ते या झाडाचे रोपन करुन त्याच्या पूजन व संगोपणाची जबाबदारी स्थानिक नागरिकावर देण्यात येणार आहे. पर्यावरणाचा र्‍हास होत चालल्याने ग्लोबल वॉर्मिगची समस्या उभी राहून उन्हाळ्यात सजिवांना जगणे असाह्य झाले आहे. म्हणून स्व.भाऊसाहेब थोरात यांनी सुरु केलेल्या दंडकारण्य अभियान हे आ. थोरात व आ. डॉ.तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली लोकचळवळ ठरली आहे. प्रत्येक महिलेने एक झाड लावून त्याचे संवर्धन केले पाहिजे. घराच्या भोवती परसबाग लावून झाडे वाढवावी. दंडकारण्य अभियानात प्रत्येकाने सहभाग नोंदवावा असे आवाहन ही त्यांनी केले आहे. महिला वर्गातून या अभिनव उपक्रमाचे मोठे स्वागत करण्यात आले असून संगमनेर तालुक्याचा हा उपक्रम संपूर्ण देशाा मार्गदर्शक ठरणार आहे.