बाबरी मशीद प्रकरणाची आता रोज सुनावणी
लखनऊ, दि. 23 : बाबरी मशीद प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या विशेष न्यायालयात आता रोज सुनावणी होणार आहे. यासंदर्भातील आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. या खटल्याची रोज सुनावणी घेऊन दोन वर्षांत निकाल देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने विशेष न्यायालयाला दिला होते.
लखनऊमधील विभागाच्या विशेष न्यायालयाने या प्रकरणी सर्व कागदपत्रांची छाननी करण्यास सुरुवात केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार रायबरेली येथे सुरू असलेला खटला या न्यायालयात वर्ग करण्यात आला आहे. दरम्यान, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी, उमा भारती आणि मुरली मनोहर जोशी यांच्याविरोधात गुन्हेगारी कट रचल्याप्रकरणी वेगळा खटला बरेली न्यायालयात चालवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालायने दिले होते. दरम्यान, लखनौमधील सत्र न्यायालयामध्ये या प्रकरणाची दररोज सुनावणी होईल. या खटल्याची सुनावणी पूर्ण होईपर्यंत संबंधित न्यायाधीशांची बदली करता येणार नाही. या प्रकरणातील साक्षीदार दररोज सुनावणीसाठी हजर राहतील आणि खटल्याच्या सुनावणीत विलंब होणार नाही, याची दक्षता केंद्रीय अन्वेषण विभागाने घ्यावी, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले होते.