Breaking News

आता राज्यातील प्रत्येक एसटीवर ’जय महाराष्ट्र’ची पाटी

मुंबई, दि. 28 - राज्य परिवहन मंडळाच्या प्रत्येक बसवर आता ‘जय महाराष्ट्र’ लिहिलेलं आपल्याला पाहयला मिळणार आहे, याबाबतची घोषणा राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केली आहे. काही दिवसांपूर्वी कर्नाटकचे नगरविकास मंत्री रोशन बेग यांनी कर्नाटकच्या लोकप्रतिनिधींनी जय महाराष्ट्र म्हणल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा दिला होता. बेग यांच्या इशार्‍यानंतर महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागात यावरूनच वाद निर्माण झाला.
विशेष म्हणजे, यानंतर महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींना कर्नाटक बंदीचा फतवा बेळगाव जिल्हाधिकार्‍यांनी काढल्याने, यावरुन राजकारण चांगलंच तापलं होतं. बेग  यांच्या फतव्याचा निषेध करण्यासाठी परिवहन मंत्री दिवाकर रावते आणि आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी कर्नाटकात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. पण  महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील कोगनोळी टोल नाक्यावर रावतेंचा ताफा कर्नाटक पोलिसांनी रोखला. यावरुन आता रावते यांनी राज्य परिवहन मंडळाच्या प्रत्येक बसवर  ‘जय महाराष्ट्र’ची पाटी लावण्याची घोषणा केली आहे.