Breaking News

मुलांना बालपणातच खेळू-बागडू दिले पाहिजे- संगमनाथ महाराज

अहमदनगर, दि. 29 - मुलं ही देवाघरची फुलं असतात, त्यांचे संगोपन हे काळजीपूर्वक करावे लागते. त्यांच्या कला-गुण पारखून त्यांना त्यांच्या कलेने घेतल्यास त्यांचीतील आत्मविश्‍वास वाढीस लागतो. मुलांना बालपणातच खेळू-बागडू दिले पाहिजे. मोबाईल व कॉम्प्युटरच्या युगामुळे घरात बसून त्यांच्यात एकलकोंडेपणा येवू शकतो, त्यासाठी मुलांमध्ये जावून सांघिक खेळ, कला, नृत्य, संगीत यामुळे त्यांच्यात एकोप्याची भावना वाढीस लागते. हीच गोष्ट लक्षात घेऊन महापौर सुरेखा कदम यांनी मुलांसाठी जो उपक्रम हाती घेतला तो कौतुकास्पद असाच आहे, असे प्रतिपादन शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिरचे पुजारी संगमनाथ महाराज यांनी केले.
नगर शहराच्या वर्धापन दिनानिमित्त महापौर सुरेखा कदम यांच्या संकल्पनेतून लहान मुलांसाठी ‘बालभारत 2017’चे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीराचे उद्घाटन श्री विशाल गणेश मंदिरचे पुजारी संगमनाथ महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी नगरसेवक दत्ता कावरे, शहर बँकेचे संचालक शिवाजी कदम, संभाजी कदम, मर्चंट बँकेचे चेअरमन विजय कोथिंबीरे, दयानंद वाबळे, अजय डहाळे, अभिजित सौदागर, अमोल बागुल, रमेश खेडकर आदि उपस्थित होते.
याप्रसंगी महापौर सुरेखा म्हणाल्या, सध्या उन्हाळ्याच्या सुट्या असल्याने मुलांना शिस्तीत धमाल व मस्ती करण्यासाठी या बालभारत उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सध्या मुलांमध्ये एकत्र येण्याचे प्रमाण कमी होत चालले आहे. मुले मोबाईल गेममध्येच गुंतून राहू लागले आहेत. त्यामुळे त्यांच्या कला-गुणांना वाव देण्यासाठी व त्यांचा सर्वांगिण विकास करण्यासाठी हा उपक्रम हाती घेतला आहे.
याप्रसंगी संभाजी कदम म्हणाले, सध्या उन्हाळा तीव्र असल्याने मुलांना बाहेर खेळता येत नाही. त्यामुळे सर्व मुलांना एकत्रित करुन त्यांना आपल्या आवडत्या विषयाचे ज्ञान मिळावे, या उद्देशाने या शिबीरचे आयोजन केले आहे. यामध्ये बासरीवादन, रांगोळी, आर्ट अ‍ॅण्ड क्राफ्ट, चित्रकला, योग, प्राणायम, गीतगायन, कथावाचन, भाषण, निबंधलेखन, हस्ताक्षर, नृत्य, वाद्य आदि विषयांचे किमान प्राथमिक ज्ञान मुलांना मिळावे हा उद्देश यामागे आहे. त्यासाठी प्रशिक्षित शिक्षक मार्गदर्शन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल बागुल यांनी केले.