Breaking News

मुलींचे जावळ मोफत कवठेमहांकाळ तालुका नाभिक संघटनेचा निर्णय

सांगली, दि. 26 - वाढत्या स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी कवठेमहांकाळ तालुक्यात जन्माला येणार्या मुलीचे जावळ मोफत करण्याचा निर्णय कवठेमहांकाळ तालुका  नाभिक संघटनेच्यावतीने घेण्यात आला आहे. नाभिक संघटनेचे हे परिवर्तनवादी विचारांचे पहिले पाऊल असल्याचे मत सांगली जिल्हा परिषदेचे माजी सभापती  गजानन कोठावळे यांनी व्यक्त केले.
कवठेमहांकाळ येथील संत सेना महाराज भवनात स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी आयोजित प्रबोधनपर कार्यक्रमात कवठेमहांकाळ तालुका नाभिक संघटनेच्यावतीने हा  निर्णय जाहीर करण्यात आला. या कार्यक्रमात नाभिक समाजातील विविध मान्यवरांचा विशेष सत्कार करण्यात आला. देशात मुलींचे प्रमाण कमी होत आहे, ही  चिंताजनक व गंभीर बाब आहे. सांगली जिल्ह्यातही मुलींचे प्रमाण कमी आहे. मुलींचा जन्मदराचा टक्का वाढविण्यासाठी नाभिक बांधवांनी घेतलेला निर्णय परिवर्तनवादी  आहे. हा आदर्श महाराष्ट्रातील सर्वांनीच घ्यावा व संत सेना महाराज मुलगी वाचवा, मुलगी शिकवा अभियान बळकट करावे, असे आवाहन गजानन कोठावळे यांनी  केले.
प्रारंभी कवठेमहांकाळ तालुका नाभिक संघटनेचे अध्यक्ष सोमनाथ साळुंखे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. या कार्यक्रमास नंदकुमार सपकाळ, बाळासाहेब जाधव,  उत्तम खंडागळे, विजय वास्कर, सुभाष काळे, राजेंद्र काळे व संदीप साळुंखे यांच्यासह नाभिक समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुधीर सपकाळ यांनी  आभार मानले.