Breaking News

चांदोलीत आढळले तीन बिबट्यांसह 555 वन्य प्राणी

सांगली, दि. 26 - चांदोली राष्ट्रीय उद्यानात तीन बिबट्यांसह 555 वन्यप्राणी आढळून आले आहेत. या प्राण्यांची गणना दि. 3 ते 11 मे या कालावधीत करण्यात  आली असून त्याचा प्रजातीनिहाय अहवाल नुकताच वन्य जीव विभागाच्यावतीने जाहीर करण्यात आला आहे.
चांदोली राष्ट्रीय उद्यानात दरवर्षी वन्यप्राणी गणना केली जाते. यंदाही दि. 3 ते 11 मे या कालावधीत ही गणना करण्यात आली. ट्रान्झीट लाईन पध्दतीने व बुध्द  पौर्णिमेदिवशी पाणवठ्यावरील गणना करण्यात होती. या प्राणी गणनेसाठी 16 विभाग करण्यात आले होते. त्या प्रत्येकात दोन ट्रान्झीट लाईन आहेत. हजार हेक्टर  क्षेत्रात एक ट्रान्झीट लाईन होती. तिथे प्रत्येकी तीन प्रगणकांची नियुक्ती करण्यात आली होती. प्राण्यांची विष्ठा व झाडावरील ओरखडे यांच्या नोंदी घेण्यात आल्या.
त्यात तीन बिबटे, 169 गवे, 168 रानडुकरे, 20 अस्वले, 17 सांबर, पाच शेकरू, एक गरूड व पाच साळिंदर यांच्यासह अन्य प्राणी अशा एकूण 555 प्राण्यांची  नोंद करण्यात आली. मुख्य वन संरक्षक डॉ. व्ही. कलेमेट बेन, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या उपसंचालक डॉ. श्रीमती विनिता व्यास व कुंडल वन अकादमीचे  महासंचालक सर्ङ्गराज खान यांच्या मार्गदर्शनाखाली वन्यजीव अधिकारी, वन कर्मचारी, मजूर, प्राणीमित्र व कुंडल वन अकादमीचे प्रशिक्षणार्थी वन क्षेत्रपाल यांच्या  सहाय्याने ही प्राणी गणना पूर्ण करण्यात आली.