Breaking News

म्हणून टीम इंडियाने सरावात पांढर्‍या चेंडूऐवजी लाल चेंडू वापरला!

लंडन, दि. 31 - आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी लंडनमध्ये दाखल झालेल्या टीम इंडियाच्या सरावात पांढर्‍या चेंडूंची खरं तर अजिबात कमतरता नाही. तरीही भारतीय फलंदाजांना एका नेटमध्ये आवर्जून लाल चेंडूवर सराव करायला लावलं जात आहे. यामागे खास कारण आहे. टीम इंडियाचे फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांच्या आग्रहाखातर एका नेटमध्ये सरावात लाल चेंडूवर सराव केले जात आहे. त्याचं कारणही तितकंच खास आहे.
इंग्लंडमधल्या वातावरणात चेंडू उशिरा स्विंग होतो. त्यामुळं भारतीय फलंदाजांना त्या दृष्टीनं आपल्या तंत्रात बदल करावा लागणार आहे. भारतीय फलंदाजांना नेट्समध्येच ती सवय लागावी हा बांगर यांचा प्रयत्न आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी वापरण्यात येणार्‍या पांढर्‍या चेंडूपेक्षा कसोटी क्रिकेटसाठीचा लाल चेंडू किंचित उशीरा स्विंग होतो. त्यामुळं भारतीय फलंदाजांच्या तीनपैकी एका नेटमध्ये लाल चेंडूनं सरावाची व्यवस्था करण्यात आली आहे.