Breaking News

बांगलादेशचा केवळ 84 धावात खुर्दा, भारताचा 240 धावांनी विजय

लंडन, दि. 31 - कर्णधार विराट कोहलीच्या टीम इंडियाने लागोपाठ दुसर्‍या सराव सामन्यात शानदार विजय मिळवून आपण आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी राखण्यासाठी सज्ज असल्याचं दाखवून दिलं आहे. लंडनमधल्या केनिंग्टन ओव्हलवरच्या सामन्यात भारताने बांगलादेशचा 240 धावांनी धुव्वा उडवला. भारतीय फलंदाज आणि गोलंदाजांनी या सामन्यावर निर्विवाद वर्चस्व गाजवलं.
या सामन्यात टीम इंडियाने बांगलादेशला विजयासाठी 325 धावांचं डोंगराएवढं आव्हान दिलं होतं. पण भारताच्या प्रभावी आक्रमणासमोर बांगलादेशचा अवघ्या 84 धावांत खुर्दा उडाला. भारताच्या भुवनेश्‍वर कुमार आणि उमेश यादवने प्रत्येकी तीन फलंदाजांना माघारी धाडून बांगलादेशला गुंडाळण्यात मोलाची भूमिका बजावली. त्याआधी भारतीय फलंदाजांनी धावांच्या वाहत्या गंगेत हात धुवून घेतले. दिनेश कार्तिकने 77 चेंडूंत 94 धावांची, शिखर धवनने 67 चेंडूंत 60 धावांची आणि हार्दिक पंड्याने 54 चेंडूंत नाबाद 80 धावांची खेळी करुन भारताच्या डावाच्या उभारणीत प्रमुख योगदान दिलं. केदार जाधवने 31 आणि रवींद्र जाडेजाने 32 धावांची खेळी केली.