Breaking News

रावसाहेब दानवे यांच्या तथाकथित नातेवाईकास अटक

कराड, दि. 24 (प्रतिनिधी) : भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे नातेवाईक असल्याचे सांगून करोडो रुपये उकळणार्‍या भामट्याला औरंगाबाद पोलिसांनी कराड पोलिसांच्या मदतीने शेणोली परिसरातील एका गावात छापा टाकून चौकशीसाठी ताब्यात घेतले. 
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा नातेवाईक असल्याचे सांगून करोडो रुपये उकळणार्‍या गणेश साहेबराव बोरसे-पाटील (रा. खडकेश्‍वर, औरंगाबाद) यास औरंगाबाद पोलिसांनी अटक केली आहे. बोरसे याने शेकडो बेरोजगारांना नोकरी लावून देण्याच्या, तर शासकीय अधिकारी, कर्मचार्‍यांना बदली, बढती मिळवून देण्याच्या आमिषाने गंडा घातल्याचे पोलिसांच्या प्राथमिक चौकशीतून समोर आले आहे. या प्रकरणाची चौकशी औरंगाबाद पोलिसांकडून सुरू आहे. या प्रकरणातील चौकशीतून कराड तालुक्यातील एका व्यक्तीचे नाव समोर आले. त्यामुळे औरंगाबाद पोलिसांचे एक पथक कराडमध्ये दाखल झाले होते. औरंगाबाद पोलिसांनी कराड शहर पोलिसांची मदत घेत शेणोली परिसरातील एका गावात छापा टाकला. यावेळी एका व्यक्तीला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. तसेच त्यानंतर संबंधित पोलीस औरंगाबादकडे रवाना झाल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली. दरम्यान, कराड शहर पोलिसांनी या कारवाईच्या वृत्ताला दुजोरा दिला. तसेच कराड तालुक्यातील व्यक्तीचा या गुन्ह्यात सहभाग आहे का? याचा तपास औरंगाबाद पोलीस करत आहेत.