Breaking News

कोयनेतून कर्नाटकला सोडलेले पाणी दोन तासात बंद

कोयनानगर, दि. 24 (प्रतिनिधी) : कर्नाटक राज्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने कोयना धरणातून कर्नाटकसाठी पाणी सोडण्यास प्रारंभ झाला होता. मात्र अवघ्या दोन तासातच धरणातून पाणी सोडलेले पाणी थांबविण्याचा निर्णय धरण व्यवस्थापनाने घेतला. त्यामुळे पाणी सोडण्याचा घेतलेला निर्णय ही तांत्रिक चूक होती की राजकीय दबाव वाढल्याने धरण व्यवस्थापनाला कर्नाटकचे पाणी बंद करावे लागले, हे समजू शकले नाही.
महाराष्ट्र-कर्नाटक या दोन राज्यात झालेल्या सामंजस्य करारानुसार गत दोन वर्षापासून कोयना धरणातून कर्नाटक राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या निवारणासाठी वेळोवेळी पाणी सोडले जात आहे. गत महिन्यात कर्नाटक राज्यासाठी कोयना धरणातून 2.36 टीएमसी पाणी सोडले होते. त्यानंतर रविवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास कर्नाटक राज्यासाठी कोयना धरण्यातून पाणी सोडण्यास प्रारंभ झाला.
धरणाचे रिवर स्विस गेट उघडून त्यातून नदी पात्रात पाणी सोडणे सुरू झाले. मात्र केवळ दोन तासातच बारा वाजण्याच्या सुमारास धरण व्यवस्थापनाने पाणी सोडणे बंद केले. अवघ्या दोन तासातच पाणी सोडणे का थांबविले गेले, याबाबत धरण व्यवस्थापनाने कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही.
सध्या धरणात 22 टीएमसी एवढा पाणीसाठा आहे. धरणातील पाण्यावर कार्यान्वित असणारे पश्‍चिमेकडील तिसरा व चौथा टप्पा हे दोन वीज प्रकल्प गत महिन्यापासून बंद आहेत. त्यामुळे 1.320 मेगावॅट विजेचा तुटवडा निर्माण झाला आहे. या पार्श्‍वभूमीवर प्रकल्पाने स्पष्ट केल्यानुसार रविवारपासून पुन्हा एकदा 10 ते 12 दिवस कालावधीत 2.36 टीएमसी पाणी कर्नाटकला सोडण्यात येणार होते, त्यामुळे राज्यभरातील नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटला होता. मात्र अवघ्या दोन तासातच धरण व्यवस्थापनाने कर्नाटकला पाणी सोडणे थांबविण्याचा निर्णय घेतल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. पाणी सोडण्याचा निर्णय बदलण्यामागे मुळातच हा निर्णय म्हणजे तांत्रिक चूक होती की राजकीय दबाव वाढल्याने निर्णय बदलण्यात आला, याबाबत नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे.