Breaking News

राजीनामा देणार की कारागृहात जाणार, मनोज तिवारींचा केजरीवाल यांना सवाल

नवी दिल्ली, दि. 09 - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आता राजीनामा देणार की कारागृहात जाणार असा थेट प्रश्‍न भारतीय जनता पक्षाचे दिल्लीचे प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांनी केला आहे. दिल्लीचे माजी मंत्री कपिल मिश्रा यांनी केजरीवाल यांच्यावर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर तिवारी यांनी ट्विटरच्या माध्यमातून हा प्रश्‍न केला आहे.
एका मंत्रिमंडळातील मंत्री स्वत: साक्षीदार झाले आहेत. प्रत्यक्षदर्शी व्यक्तीच्या साक्षीला घटनेत महत्वाचे स्थान आहे आणि हा पुरावा भक्कम समजला जातो. इतकेच नव्हे तर शुंगलू समितीनेही केजरीवाल यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. यामुळे केजरीवालांविरोधात कारवाई झाली पाहिजे. केजरीवाल यांनी राजीनामा द्यावा आणि केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. केजरीवाल नेहमी नैतिकतेच्या गोष्टी करत असतात. आता त्याच नैतिकतेच्या आधारावर त्यांनी राजीनामा द्यावा. केजरीवाल यांना सत्तेची भूक आहे. सत्तेच्या लोभापाई केजरीवाल खुर्चीला चिकटून बसले आहेत, असा टोला तिवारी यांनी लगावला.