Breaking News

संगीतात शिष्याच्या योगदानालाही महत्त्व - पं. शरद साठे

पुणे, दि. 04 - संगीतात गुरु-शिष्य परंपरेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. संगीत ही गुरुमुखी विद्या असली तरी शिष्याने आपल्या प्रतिभेनुसार त्यात भर घातली पाहिजे.’ असे ग्वाल्हेर घराण्याचे जेष्ठ गायक पं. शरद साठे म्हणाले. निमित्त होते गानवर्धन सेंस्थाच्या वतीने पं. शरद साठे यांना देण्यात आलेल्या पं. त्र्यंबकराव जानोरीकर संगीत भूषण पुरस्कार’ कार्यक्रमाचे. 
पं. साठे म्हणाले, तीन गुरुंकडून मिळालेल्या विद्येचे फळ म्हणून घडलो. माझे गुरु पं. डी. व्ही. पलुस्कर व पं. त्र्यंबकराव जानोरीकर हे पं. विनायकबुवा पटवर्धन यांचे शिष्य. त्यामुळे पं. जानोरीकर यांच्या नावाचा पुरस्कार मिळणे माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. पुण्यातील रमणबाग प्रशालेत पं. जानोरीकर मला संगीत शिक्षक होते. त्यामुळे एका अर्थाने हा पुरस्कार गुरुचा आशीर्वादच आहे.’
सत्कार समारंभानंतर पं. साठे यांच्या गायनाची मैफल झाली. त्यांनी पूरिया कल्याण रागामध्ये कैसी अंधेरिया रैन’ ही ताल झुमरा मधील तर तीन तालातील द्रुतलयीतील लटक चला मतवारो’ ही रचना सादर केली. त्यानंतर कामोद रागात झुमरा तालातील सोहैल रा’ व द्रुत लयीतील जाने ना दूंगी व तराणा सादर केला. कार्यक्रमाची सांगता भैरवीतील मानिवे वसंत’ हा टप्पा तसेच द्रुत तराणा सादर करुन केली. त्यांना तबल्यावर श्रुतींद्र कातगडे तर हार्मोनिअमवर सुयोग कुंडलकर यांनी समर्पक साथ दिली. सूत्रसंचालन सविता हर्षे यांनी केले.