शाहू महाराज स्मारकासाठीची जागा हरित क्षेत्रामधून वगळण्याचा निर्णय
मुंबई,दि. 23 : राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाधी स्मारकासाठी आवश्यक असणारी कोल्हापूर येथील जागा हरित क्षेत्रातून वगळून तिचा समावेश सार्वजनिक किंवा निम सार्वजनिक विभागामध्ये समाविष्ट करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मान्यता दिली. या निर्णयामुळे शाहू महाराजांच्या समाधी स्मारकाच्या कामास गती मिळणार आहे. कोल्हापूर शहराची दुसरी सुधारित विकास योजना 2000-01 पासून अंमलात आली आहे. समाधी स्मारकासाठी आवश्यक असणार्या जागेच्या आरक्षण फेरबदलाची कार्यवाही करण्यासाठी यापूर्वी कोल्हापूर महापालिकेने महासभेचा ठराव घेऊन त्यासंदर्भातील माहिती राजपत्र आणि वृत्तपत्रात प्रसिद्ध केली होती. त्यावर नागरिकांच्या हरकती किंवा सूचना मागविण्यात आल्या होत्या. त्यानंतर हा प्रस्ताव राज्य शासनाला पाठविण्यात आला होता. या प्रस्तावानुसार एकूण 10 हजार 455 चौ. मी. जागेच्या आरक्षणाच्या फेरबदलास मान्यता देण्यात आली.
छत्रपती शाहू महाराजांच्या स्मारकासाठी मागणी करण्यात आलेल्या जागेचा वापर शाहू महाराज यांचे समाधी स्मारक आणि त्याभोवताली बाग यासाठीच होणार आहे. या क्षेत्रातील काही भागात असणारा विद्यमान बगिचा कायम ठेवण्यात येणार आहे. तसेच या जागेमध्ये असणार्या शककर्ते छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती ताराराणी यांचे मंदिर यासह अन्य समाधी यामध्ये कोणताही बदल करण्यात येणार नाही.