Breaking News

भाषा हे व्यक्त होण्याचे माध्यम आहे - प्रा. पुष्पा भावे

पुणे, दि. 29 -: आपण भाषा व्यवहारात नसलो तरी कायम व्याकरण वापरत असतो. भाषा हे व्यक्त होण्याचे माध्यम आहे, ज्याला भाषा येते तोच विचार करू  शकतो. भाषा हे जगण्याचे साधन आहे, भाषा गर्वाचे माध्यम नाही, त्याचे राजकारण केले जाते, भाषेविषयीवे अनेक वाद गैरसमजातुन निर्माण झाले आहेत. भाषा हे  माणुस आणि अधिक चांगला माणुस होण्याचे साधन आहे असे मत ज्येष्ठ विचारवंत प्रा. पुष्पा भावे यांनी शनिवारी व्यक्त केले. 
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या 111 व्या वर्धापनदिन सोहळ्यात ज्येष्ठ व्याकरण तज्ज्ञ प्रा. यास्मीन शेख यांना ‘मसाप जिवनगौरव’ आणि सु. प्र. कुलकर्णी यांना  ‘भिमराव कुलकर्णी कार्यकर्ता’पुरस्काराने भावे यांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले, यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत आणि  मसापचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे होते. मसापचे विश्‍वस्त डॉ. शिवाजीराव कदम, माजी आमदार उल्हास पवार, मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख  कार्यवाह प्रकाश पायगुडे, सुनिताराजे पवार आदी यावेळी उपस्थित होते.
कोणत्याही भाषेत ‘चलन’ महत्वाचे असते ते शिकवले जाते की नाही हे महत्वाचे आहे असे सांगताना प्रा. भावे म्हणाल्या, कोणत्याही नियमाने भाषा शिकता येत नाही  तर नियमोल्लंघन हेच भाषेचे वैशिष्ट्ये आहे, आज भाषेचे अवमुल्यन होत आहे ते थांबविण्याची आवश्यकता आहे. आधी भाषा येते मग व्याकरण येते, भाषा ही प्रवाही  असते मात्र तोच अस्मितेचा प्रश्‍न केला जातो, तो का केला जातो त्यांचा उद्देश लक्षात घेतला पाहिजे. मानव्यशास्त्रांच्या अभ्यासाकडे आज दुर्लक्ष होत आहे, ज्ञान फक्त  विज्ञानातुन मिळते असा लोकांचा गैरसमज निर्माण झाला आहे. त्यातही आज विज्ञानापेक्षा तंत्रज्ञानावर भर दिला जात आहे, यामुळे विद्यापीठात जे आज ब्दल होत  आहे ते विद्यापीठाचे आहेत की पॉलिटेक्नीकचे असा प्रश्‍न पडत असल्याचेही प्रा. भावे यांनी नमुद केले.
इंग्रजी शाळांमधुन मराठीची विटंबना होते असे सांगत सत्काराला उत्तर देताना यास्मीन शेख म्हणाल्या, मी काही व्याकरण तज्ज्ञ नाही, मात्र मराठी हा माझ्या  आवडीचा विषय आहे. तो अभ्यासताना त्याला भाषा विज्ञानाची जोड द्यावी असे मला वाटले, कारन भाषा विज्ञानामुळे आपल्याला तीच्या पोटात शिरता येते, त्यातुन  भाषेचे महत्व समजते. प्रवाहीपणा हे भाषेचे वैशिष्ट्ये असते, व्याकरण हा भाषेचे ज्ञान देणार विषय आहे, मात्र आपल्याकडे शिकवण्याच्या पद्धतीमुळे व्याकरण म्हटले  की अनेकांच्या कपाळावर आठ्या पडतात. मराठीमध्ये इंग्रजी आणि हिंदीची सरमिसळ करण्याचे प्रमाण वाढते आहे ही चिंतेची बाब आहे, तरूण पिढी कडून जी भाषेची  चिरफाड होते ते थांबविण्यासाठी मसापने पुढाकार घ्यावा असे अवाहन त्यांनी केले. दरम्यान यावेळी मसापच्या वतीने दिल्या जाणार्‍या विविध पुरस्कारांचे वितरण  करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन उद्धव कानडे यांनी केले.