Breaking News

भामा-आसखेड धरणातून तब्बल 2. 64 टीएससी पाणी घेणार

पुणे, दि. 29 - शहराच्या पूर्वभागाला पाणी पुरवठा करण्यासाठी महापालिकेकडून भामा-आसखेड धरणातून तब्बल 2. 64 टीएससी पाणी घेण्यात येणार आहे. एका  बाजूला त्यासाठीच्या प्रकल्पाचे 70 टक्के काम पूर्ण झाले असतानाच; दुसर्‍या बाजूला मात्र, हे पाणी घेण्यासाठी पाटबंधारे विभाग आणि महापालिके मध्ये करार होणे  आवश्यक असून हा करार सिंचनपुन:स्थापना खर्चासाठी रखडला आहे. या खर्चापोटी पाटबंधारे विभागाने महापालिकेकडे तब्बल 172 कोटी रूपयांची मागणी केली  आहे. तर हा खर्च माफ केला जावा अशी मागणी महापालिकेने राज्यशासनाकडे केली आहे. त्यामुळे या निधीच्या गोंधळात हा करार रखडला आहे. दरम्यान, हा करार  करण्यासाठी जलसंपदा विभागाचे राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी या दोन्ही विभागांची बैठक घेऊन त्यांना सूचना केल्या होत्या. मात्र, महापालिका आणि पाटबंधारे  विभाग आपल्या भूमिकांवर ठाम असल्याने हा करार योजना पूर्ण झाली तरी रखडणार असल्याची चिन्हे आहेत.
महापालिकेकडून शहरातील पूर्व भागातील भामा-आसखेड प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पाचे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. मात्र, धरणातील हे पाणी  घेण्यासाठी महापालिका आणि पाटबंधारे विभाग यांच्यात या पाण्याचा करार होणे अपेक्षीत आहे. प्रत्यक्षात योजनेचे काम सुरू होण्या आधीच हा करार होणे अपेक्षीत  होते. मात्र, धरणातून महापालिकेस दिल्या जाणार्‍या पाण्यामुळे जेवढे सिंचन क्षेत्र कमी होणार आहे. त्या सिंचन क्षेत्रानुसार, प्रती हेक्टर 1 लाख रूपयां प्रमाणे 172  कोटींच्या निधीची मागणी पाटबंधारे विभागाने महापालिकेकडे केली आहे. त्यास पालिकेने या पूर्वीच विरोध करत तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या  योजनेसाठी घेतलेल्या बैठकीत शासनने हा खर्च माफ करावा अशी मागणी केली होती. त्याबाबत अद्याप शासनाकडून कोणताही निर्णय झालेला नाही. त्यातच ही रक्कम  मोठी असल्याने महापालिकेने ती देण्यास साफ नकार दिला आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाने करार करण्यासाठी आधी हा निधी देण्याची मागणी केली असल्याने तीन  वर्षापासून या योजनेचे काम सुरू असले तरी, महापालिका आणि पाटबंधारे विभागामध्ये मात्र, पाणी वाटपाच करार झालेला नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.