माजी मंत्री मधुकरराव पिचड यांचे वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम
1 जूनला ज्येष्ठ नागरीकांचा गौरव सोहळा
अकोले, दि. 29 - अकोले तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तालुक्याचे भाग्यविधाते राज्याचे माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या वाढदिवसानिमित्त येथील अगस्ति आश्रमात गुरुवारी (दि. 1) सकाळी 11 वाजता अभिष्टचिंतन गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आमदार वैभवराव पिचड यांनी दिली.अर्धशतकाहून अधिक काळ श्री. पिचड यांच्या खांद्याला खांदा लावून अकोले तालुक्यातील ज्येष्ठ नागरीकांनी मोलाची साथ दिली आहे. त्यांचे अकोले तालुक्यातील विविध विकास कार्यात कृतीशील योगदान असून ते श्री.पिचड यांच्या दमदार व नेत्रदिपक कामगिरीची शिलेदार व साक्षीदार राहिलेले आहेत. अशा या ज्येष्ठ नागरीकांचा तालुक्यातील सामाजिक, कृषी, सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक व इतर क्षेत्रात मोठा वाटा आहे. त्यांच्या ऋणात राहून त्यांच्या विलक्षण पैलूचा सन्मान करण्याचा मानस पिचड साहेब यांनी व्यक्त केला. त्यादृष्टीने या अभिष्टचिंतन गौरव सोहळ्याप्रसंगी या ज्येष्ठ नागरीकांचा कृतज्ञता सोहळा संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी दामू अण्णा सहाणे असणार आहेत. या गौरव सोहळ्यााप्रसंगी सत्कारमूर्तींचे सन्मानपत्र वाटप नारायण पाटील सदगीर व श्रावणा हिले यांच्या शुभहस्ते होणार आहे. स्मृतीचिन्ह वाटप एल. बी. आरोटे व धरणग्रस्तांचे नेते विठ्ठलराव आभाळे यांचेहस्ते होणार आहे. तसेच कृषि उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती परबतराव नाईकवाडी यांनी वाघाने केलेला हल्ला यशस्वीरीत्या परतवून लावल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार ज्येष्ठ नेते लक्ष्मणराव शिंदे यांच्याहस्ते होणार आहे. त्याचप्रमाणे आपणासर्वांचे मार्गदर्शक राज्याचे नव्हे तर देशाचे ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांचा यावेळी भव्य नागरी सत्कार केला जाणार आहे.
या कार्यक्रमासाठी आमदार वैभवराव पिचड, जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन सिताराम पा.गायकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष मिनानाथ पांडे, तालुकाध्यक्ष गिरजाजी जाधव, अभिनव शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मधुकरराव नवले, जि. प. अर्थ व बांधकाम समितीचे सभापती कैलासराव वाकचौरे तसेच तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. तरी, या कार्यक्रमासाठी सर्व नागरीकांनी उपस्थित रहावे असे आवाहन स्वागताध्यक्ष रंगनाथ पाटील वाकचौरे, पक्षाचे सचिव यशवंतराव आभाळे यांनी केले आहे.