अकोले भाजपची मान्हेरेत शिवार संवाद सभा
शासकीय योजनांपासून वंचित रहावे लागत असल्याची ग्रामस्थांची खंत
अकोले, दि. 29 - महाराष्ट्रात सर्वत्र भाजपचे शिवार संवाद सभा अभियानात चालू आहे, त्यानिमीत्ताने मान्हेरे येथे भाजप जिल्हा परिषद गटनेते जालिंदर वाकचौरे, दिनेश शहा, प्रवीण सहाणे, शंकर सदगीर, गभाले गुरुजी यांच्या उपस्थितीत शिवार संवाद सभा पार पडली. या वेळी जालिंदर वाकचौरे यांनी केंद्र व राज्य सरकारच्या लोकाभिमुख योजना व सरकारने गोरगरीब शेतकरी, आदिवासी यांच्यासाठी केलेल्या कामांची माहिती दिली.आघाडीचे सरकार असताना पंधरा वर्षात शेतकर्यांसाठी रोख मदत साडे सहा हजार कोटी दिली, मात्र फडणवीस सरकारने अवघ्या अडीच वर्षात बारा हजार कोटी रुपयांची रोख मदत शेतकर्यानां दिली असल्याचे वाकचौरे यांनी यावेळी सांगितले. जल युक्त शिवार योजना प्रभावीपणे राबवण्यात आली असल्याचेही ते म्हणाले.
यावेळी ग्रामस्थांनी अनेक समस्या पदाधिकार्यांसमोर कथन केल्या. राजुर प्रकल्प कार्यालयाच्या मार्फत आदिवासीना मिळ्णार्या व्यक्तीगत लाभाच्या योजना आमच्यापर्यंत कधी पोहचल्याच नाहीत व ठराविक लोकांनाच वारंवार योजना मिळतात. त्या ठिकाणी दलाल व ठराविक अधिकारी तोंड पाहुन कामे करतात अशा तक्रारी मांडल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरीबांना गॅस ह्या उज्वल योजने अंतर्गत लाभार्थी निवडले परंतु गॅस वितरक जास्त पैसे आकारतात, मंजूर करण्यात आलेले कनेक्शन मिळत नाही अशीही खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली. परिसरात जलसंधारणाची कामे करण्यात यावीत अशी मागणीही करण्यात आली. वाकी तलावातुन सामुदायिक लिफ्ट मंजूर झाली. काही प्रमाणात काम पण झाले परंतु लाखो रुपये खर्च करुन ही योजना अर्धवट राहिली, त्यामुळे शेतकरी पाण्यापासून वंचित राहिले. अशा अनेक समस्या मान्हेरे ग्रामस्थांनी मांडल्या.