Breaking News

अकोलेत दक्षता समितीत विविध ठराव पारीत

अकोले, दि. 05 - अन्न धान्य वाहतूक एक किलोमीटर पेक्षा जास्त नको.शिलकी धान्याची नोंद फलकावर केली  जावी. रॉकेलचा 100 टक्के कोटा आगामी काळात उपलब्ध केला जावा. गॅस धारकाला गॅस सिलेंडर वाहतुकीला 7 किलो मीटरची मर्यादा घातली जावी.रॉकेलचा कोटा गॅस धारकालाही दिला जावा. हे व अन्य ठराव काल दुपारी तहसील कार्यालयात झालेल्या बैठकीत पारीत केले गेले.
अन्न धान्य दक्षता समितीची आज दुपारी बैठक झाली. आ. वैभवराव पिचड बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. तर सभापती रंजना मेंगाळ, नगराध्यक्ष के. डी. धुमाळ, गटविकास अधिकारी सुमीत पाटील, तहसीलदार मनोज देशमुख हे मान्यवर व्यासपीठावर होते.
आ. पिचड यांनी प्रत्येक विभागाची माहिती घेतांना तहशीलदार व पुरवठा अधिकार्‍यांना धारेवर धरले. शिवाय गरीबांना दिल्या जाणार्‍या धान्याला घोटी मार्गे कसे पाय फुटतात.असा सवाल करून व इतर प्रश्‍न विचारून प्रशासनाला बॅक फूटवर जाण्यास भाग पाडले. मागणी पत्रकाप्रमाणे माल पुरवला जातो. पण शिलकी धान्य कुठे गायब होते, असा तिरकस सवालही त्यांनी केला.
अन्नधान्य दप्तराची दर महिन्याला तपासणी झाली पाहिजे अशी मागणी यावेळेस केली गेली. तर दारिद्रय रेषेखालील लाभधारकांना नव्हे तर बड्या व धनदांडग्यांना धान्य मिळते. गरजू मात्र त्यापासून वंचित राहतात असे डॉ. शरद तळपाडे, डॉ. विजय पोपेरे आदींनी लक्षात आणून दिले. त्यावर तहसीलदार देशमुख यांनी ग्रामीसभेकडे बोट दाखवले.
तर आ. पिचड यांनी या लाभधारकांची यादी तलाठ्यांमार्फत तपासली जावी अशी सूचना केली. गॅस पॉइंटवर बोलताना पिकअप आ. पिचड यांनी किमान 7 किलो मीटर पर्यंतच वाहतूक गॅस धारकाला करण्याची वेळ यावी अशी मागणी केली. तसा ठरावही मंजूर करवून घेतला.
वीज भार नियमनावरही यावेळेस के. डी. धुमाळ, शिवाजी नेहे, विनोद हांडे, योगेश नाईकवाडी आदींनी संताप व्यक्त केला. रात्री 2 वाजता वीज प्रवाह सोडून वीज वितरण कंपनी शेतकरी वर्गाची मुस्काटदाबी करीत आहे. असे यावेळेस ते म्हणाले.
कुपोषित बालकांचा प्रश्‍न डॉ. पोपेरे यांनी उपस्थित केला. शिवाय बीपीएलधारक जर विभक्त झाले तर ते एपीएल धारक कसे होतात, हा सवाल उपस्थित केला गेला. त्यावर आ.पिचड यांनी अशा कुटुंबांचे विभक्तीकरण झाले तरीही त्यांना केशरी कार्डच दिले जावे असा ठराव पारीत करण्यात तहसीलदारांना सांगितले.
रेशनकार्ड धारकाला केशरी शिधापत्रिकाच दिल्या जाव्यात. अंत्योदय योजना, पिवळे कार्ड धारक, केशरी कार्ड धारक व गॅस, रॉकेल अन्य पुरवठ्याबाबत यावेळेस सविस्तर चर्चा झाली.