Breaking News

महामार्ग ओलांडताना वाहनांच्या धडकेत दोन वानरांचा मृत्यू

सातारा, दि. 24 (प्रतिनिधी) : पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर सातारा तालुक्यातील बोरगाव व पाटेश्‍वरनगर या दोन वेगवेगळया ठिकाणी महामार्ग ओलांडण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोन वानरांचा वाहनांच्या धडकेत जागीच मृत्यू झाला. पाण्याचा शोध घेत असताना या दोन्ही वानरांना जीव गमवावा लागला. 
महामार्गाच्या पूर्वेस असणार्‍या डोंगरात पिण्यासाठी पाणी नसल्यामुळे सध्या वन्य प्राण्यांचा पश्‍चिमेकडील उरमोडी नदीकडे संचार सुरु आहे. त्यासाठी या प्राण्यांना महामार्ग ओलांडावा लागतो. तो ओलांडणे अनेक प्राण्यांच्या जीवावर बेतले आहे. असाचा प्रकार सायंकाळी घडला. त्यात बोरगाव नजीक वानरांचा एक समूह महामार्ग ओलांडण्याचा प्रयत्न करत असतानाच भरधाव जाणार्‍या वाहनाने त्यातील एका वानराला जोरदार धडक दिली. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. मृत वानराचा देह तसाच महामार्गावर पडून होता. ’हायवे हेल्पलाइन चे कर्मचारी महामार्गावर जात असताना त्यांना ही बाब निदर्शनास आली. कर्मचारी सुधाकर लोंढे, रमेश खुणे व बाजीराव माने यांनी तत्काळ मृत वानर बाजूला घतले. त्यानंतर सेवारस्त्यानजीकच जेसीबीच्या साहाय्याने खड्डा काढून त्याला पुरण्यात आले. त्यानंतर काही वेळातच दुसरा प्रकार पाटेश्‍वरनगरनजीक झाला. तेथील वानराचा मृतदेहही ताब्यात घेऊन पुढील सोपस्कार करण्यात आले. एकाच दिवशी दोन अपघातात दोन वानरांना प्राणाला मुकावे लागल्याने कर्मचार्‍यांनीही हळहळ व्यक्त केली.