Breaking News

अहमदनगर डिस्ट्रिक्ट मुस्लिम वेल्फेअर फौंडेशनच्या वतीने मासिक आर्थिक सहाय्य योजना सुरू

अहमदनगर, दि. 26 - अहमदनगर डिस्ट्रिक्ट मुस्लिम वेल्फेअर फौंडेशनच्या वतीने रमजान सणाच्या आगमनानिमित्त शहरातील दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने मासिक आर्थिक सहाय्य योजना सुरू करण्यात आली. याप्रसंगी संस्थेचे चेअरमन व माजी उपमहापौर हाजी नजीर शेख यांनी कार्यक्रमाचा उद्देश समाजापुढे ठेवला. समाजातील वंचित घटकांना आम्ही नेहमीच मदत केली आहे. सामाजिक उपक्रमांना प्राधान्य दिले आहे. मासिक अर्थसाह्य योजनेच्या माध्यमातून समाजातील गरजूंना मदत केली जाणार असून, यासाठी दानशूुर व्यक्तींनी मदतीचा हात द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
संस्थेचे सेक्रेटरी शेख अब्दुल कादिर सर यांनी या योजनेबद्दल सविस्तर माहिती दिली. दरमहा मासिक आर्थिक सहाय्यता योजनेमार्फत एकूण 30 अर्जदारांना या महिन्यापासून देण्यात येत आहे. यामध्ये समाजातील अनाथ, विधवा, वृद्ध, अपंग व कायम स्वरूपी आजारी महिलांना व पुरुषांचा समावेश आहे, अशी माहिती दिली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्योजक अब्दुल करीमशेठ हुंडेकरी यांनी स्वतःच्या वतीने एकवीस अर्जदारांना मासिक आर्थिक साह्य देण्याचे जाहीर केले. या संस्थेस आपण नेहमीच सहकार्य करण्यात अग्रेसर राहू, असे सांगितले. यावेळी प्रमुख पाहुणे डॉ. सईद काझी यांनी या योजनेस दर वर्षी रु. 30,000 देण्याचे जाहीर करून संस्थेच्या उपक्रमाबद्दल प्रशंसा केली.
शिक्षणमहर्षी अब्दुस सलाम सर यांनी शैक्षणिक कार्याप्रमाणे समाजसेवा हे थोर कार्य असून, ही बाब समाजातील अत्यंत गरजेची बाब असल्याचे सांगितले. आपण आर्थिक साह्य देऊ, असे जाहीर केले. सिटी लॉनचे संचालक हाजी परवेज यांनी यावेळी 4 गरजूंना मासिक अर्थसाह्य करण्याचे जाहीर केले. यावेळी संस्थेचे संचालक हाजी गुलाब हुसेन, हाजी परवेज, हाजी इकबाल, हाजी सलीम, हाजी बाबासाहब, हाजी मुबिन तांबटकर, हाजी मिर्झा, अ‍ॅड. नदिम, ज्येष्ठ समाजसेवक सय्यद इसहाकबापू, हाजी अजिज जनाब नवेद सर, शेख साजीदमहाराज, डॉ. समीर सय्यद व समाजातील थोर व्यक्ती आवर्जून उपस्थित होत्या. खजिनदार डॉ. शेख सईद अब्दुल अजीज यांनी आभार मानले. दानशूर व्यक्तींनी अर्थसाह्य करण्याचे आश्‍वासन यावेळी दिले.