Breaking News

माहिलांच्या तक्रारींचे तात्काळ निवारण करा - भापकर

औरंगाबाद, दि. 24 - विभागातील सर्व शासकीय कार्यालयामध्ये गावस्तरापासून ते जिल्हा स्तरापर्यंत महिला तक्रार निवारण समिती कार्यान्वीत असणे  आवश्यक असून या समित्यामार्फत शासकीय कार्यालयातील माहिलांच्या तक्रारींचे तात्काळ निवारण करा. असे प्रतिपादन विभागीय आयुक्त डॉ पुरुषोत्तम भापकर यांनी  केले. विभागीय आयुक्त कार्यालयात महिला व बाल विकास विभागाच्यावतीने आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.
विभागीय आयुक्त डॉ. भापकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या बैठकीस उपायुक्त प्रल्हाद कचरे, वर्षां ठाकूर, महेंद्र हरपाळकर, उपायुक्त महिला व बाल विकास,  संगिता लोंढे, उपजिल्हाधिकारी श्रीमती निता मैत्रेवार, सहायक आयुक्त श्रीमती सुत्रावे आणि विभागातील सर्व जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी , महिला व  बालविकास अधिकारी उपस्थित होते.
डॉ. भापकर बैठकीत मार्गदर्शन करतांना म्हणाले की, विभागातील ज्या कार्यालयांमध्ये दहा पेक्षा अधिक महिला कर्मचारी आहेत त्या कार्यालयात महिलांना सर्व सेवा  सुविधायुक्त महिला कक्ष उभारणे आवश्यक आहे. कार्यालयात बाहेरुन येणार्या महिलासाठी सुरक्षेच्या दृष्टीने स्वतंत्र प्रतिक्षालय असले पाहिजे त्या ठिकाणी पुरेशी बैठक  व्यवस्था, स्वच्छतागृह असली पाहिजेत. विभागातील शासकीय कार्यालयांमध्ये महिला तक्रार निवारण समित्या फारपूर्वी स्थापन केल्या आहेत त्यात काही अधिकारी  कर्मचारी यांच्या बदल्या झाल्या आहेत त्यामुळे त्या नव्याने स्थापन कराव्यात. याबाबत जिल्हयात संपर्क अधिकार्यांच्या नव्याने नेमणुका केल्या गेल्या पाहिजेत. सर्व  महिलासाठी या कायद्याबाबत कार्यशाळा आयोजित करुन महिला कर्मचार्यांना या कायद्याची माहिती करुन देण्याचे काम कार्यालयामार्फत करावे. या कायद्याची अचूक  माहिती महिलांना देण्याच्या दृष्टिने प्रयत्न होणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.
उपायुक्त (पुरवठा) श्रीमती वर्षा ठाकूर यांनी यावेळी महिला तक्रार निवारण समितीचे कार्य, भूमिका व जबाबदारी याबाबत माहिती दिली. शासकीय कार्यालयात महिला  कक्षामध्ये महिलांना सर्व सोईसुविधा उपलब्ध करुन दिल्या पाहिजे याबाबत सविस्तर माहिती सांगितली. बैठकीच्या सुरवातीला उपायुक्त महिला व बाल विकास श्रीमती  संगिता लोंढे यांनी प्रास्ताविक केले. विभागातील सर्व जिल्ह्याच्या निवासी उपजिल्हाधिकारी यांनी आपल्या जिल्ह्यातील या समिती संदर्भात कामकाजाची माहिती  सांगितली. महिला व बाल विकास कार्यालयातर्फे विभागाच्या रचनेबाबत सविस्तर सादरीकरण केले.