Breaking News

शासकीय विश्रामगृहात जुगार खेळणार्‍या सात जणांना अटक

बुलडाणा, दि. 26 - येथील शासकीय विश्रामगृहामध्ये सुरू असलेल्या पत्त्याच्या जुगारावर पोलिसांनी 24 मे रोजी धाड टाकून सात जुगार्‍यांना  अटक केली. या कारवाईत आरोपींकडून 1 लाख 33 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 
शहरातील शासकीय विश्राम गृहामध्ये पत्त्याचा जुगार खेळला जात असल्याची माहिती पोलीस अधीक्षक शशी कुमार मीना, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप डोईफोडे व उपविभागीय पोलीस अधिकारी बी.बी. महामुनी यांना मिळाली. त्यानुसार नेमलेल्या पथकाने विश्राम गृहामधील रुम नंबर 2 मध्ये छापा मारला. यावेळी रईसखान हबीब खान (38), विजय पंढरीनाथ गवई, शेख मुक्तार शेख दस्तगीर, मोहंमद शायेद मोहंमद कय्यूम, शफिकखान करीमखान, सय्यद रब्बानी सय्यद गणी, युसुफखाँ इस्माईलखाँ (सर्व रा. चिखली) या सात आरोपींना अटक करण्यात आली.  या आरोपींकडून रोख 12 हजार 290 रुपये, 7 मोबाइल फोन, दोन दुचाकी असा 1 लाख 32 हजार 840 मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक श्रीकांत निचळ, पोहेकॉ सुधाकर काळे, नाईक  पोलीस शिपाई राजेंद्र सानप, संदीप मिसाळ, अरुण सानप, सतीश राठोड यांनी ही कारवाई केली.