Breaking News

पोलीस व ग्रामस्थांमध्ये झालेल्या धुमश्‍चक्री प्रकरणामुळे कुरण येथे संशयीतांची धरपकड; संगमनेरातील बाजार समितीतही पडसाद

संगमनेर, दि. 21 - तालुक्यातील कुरण येथे बेकायदा गोवंश जनावरे ताब्यात घेण्याच्या कारणावरुन पोलीस व ग्रामस्थांमध्ये शुक्रवारी धुमश्‍चक्री झाली होती. या घटनेतील आरोपींना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी काल शनिवारी मध्यरात्रीपासून धरपकड सुरु केली. जवळपास 17 ते 18 संशयीतांना ताब्यात घेतले आहे. या घटनेचे पडसाद संगमनेरच्या बाजार समितीतही उमटले. व्यापार्‍यांनी टोमॅटो लिलाव बंद पाडण्याचा प्रयत्न केला. मात्र शेतकर्‍यांनी तो हाणून पाडला. दंगल सदृष्य परिस्थिती निर्माण करणार्‍या गुन्हेगारांना सोडणार नाही असा सज्जड इशारा उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अजय देवरे यांनी यावेळी दिला.
कुरण येथे शुक्रवारी दुपारी 3 वाजेच्या सुमारास पोलीस निरीक्षक गोविंद ओमासे यांना गोपनीय सुत्रांकडून माहिती मिळाली की, कुरण गावात काही खाटी जनावरे कतलीसाठी बांधून ठेवलेली आहेत. ती कत्तलीसाठी ट्रान्सफोर्टने पाठविली जाणार आहे. या माहितीवरुन त्यांनी आपल्या सहकार्यांसमवेत कुरण गाठले. एका जनावरांच्या गोठ्याजवळील डाळींबाच्या शेताला लागून खाटी जनावरे आढळून आली. कारवाई करत ही जनावरे पांजरफोळला जमा करतो अशी भूमिका पोलीस निरीक्षक गोविंद ओमासे यांनी घेतली. मात्र गोठ्याचा मालक आणि गावकरी एकत्र येत कारवाई करण्यास रोखले. या वादात शाब्दीक चकमक उडाली. याचे रुपांतर धक्काबुक्कीत हावून दोन पोलीस कर्मचार्‍यांना मारहाण करन्यात आली. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अजय देवरे यांनी घटनास्थळी
धाव घेतली. मात्र त्यांचा ताफा जमावाने दोन्ही दिशेने ट्रॅक्टर आडवे घालून अडविला होता. यावेळी जमावाकडून पोलिसांच्या दिशेने किरकोळ दगडफेकही करण्यात आली.
डॉ. देवरे यांनी घटनास्थळी पोलीस कुमक वाढवून परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांना जमावाने गावाबाहेरच घेरले होते. जमावाने पैशाची मागणी करणार्‍या पो. नि. गोविंद ओमासे यांची बदली करण्याची मागणी केली. त्यांचे निवेदनही डॉ. देवरे यांनी स्विकारुन उद्भवलेली परिस्थिती आटोक्यात आणली. घटनास्थळी रात्री उशीरा श्रीरामपूरचे अतिरीक्त पोलीस अधिक्षक रोहीदास पवार यांनी भेट दिली. तर शनिवारी मध्यरात्रीपासून दंगल सदृष्य परिस्थिती निर्माण करणार्‍या व पोलिसांना मारहाण करणार्‍यांची धरपकड सुरु केली. काहींना ही माहिती मिळताच गावाबाहेर पळून गेले. सकाळी 10 वाजेपर्यंत पोलीस कुरणमध्ये तळ ठोकून होते. त्यामुळे काल दिवसभर अटकेच्या भितीने कोणी गावात फिरकले नाही. तर दिवसभर या घटनेने गावातील सर्व व्यवहार बंद होते. मध्यरात्री पोलिसांचा फोडफाटा कुरणमद्ये दाखल होताच जो  घराच्या बाहेर पडेल त्याला ताब्यात घेतले. जवळपास 18 ते 18 जणांना पहाटेच्या दरम्यान पोलिस व्हॅनमधून शहर पोलिसात आणण्यात आले.
या घटनेची फिर्याद हे. कॉ. साईनाथ चिमाजी वर्पे यांनी शहर पोलिसांत दिल्यावरुन जवळपास 100 ते 150 जणांवर गुन्हा रजिस्टर नंबर 116/17 नुसार भारतीय दंड संहिता 307, 353, 332, 323, 504, 143, 147, 148, 149, महाराष्ट्र गोहत्या प्रतिबंधक कलम 5 (अ)1, 9 प्राण्यांना निर्दयपणे बाळगण्याचा अधिनियम , मु. पो. अ‍ॅ. 37 (1) (3) 135, क्रि. आ. अ‍ॅक्ट कलम 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचे पडसाद काल सकाळी 10 वाजेच्या सुमारास येथील बाजार समितीत उमटले. पोलिसांनी ताब्यात घेतलेले संशयीत बाजार समितीशी संबंधीत आहे, त्यांचा कुरण घटनेशी काही संबंध नसंतांना त्यांना विनाकारण गोवण्यात येत आहे. असा अरोप करत काही व्यापारी व बाजार समितीच्या कर्मचार्‍यांनी रास्तारोको करण्याचा प्रयत्न केला. तसेच कुरण घटनेशी बाजार समितीचा काडीमात्र संबंध नसतांना स्वयंघोषित पुढार्‍यांनी टोमॅटो लिलाव बंद पाडण्याचा प्रयत्न केला. मात्र शेतकर्‍यांनी आक्रमक धोरण घेत त्यांचा प्रयत्न हाणून पाडला. ज्यांनी दंगल सदृष्य परिस्थिती निर्माण केली अशा गुन्हेगारांना सोडणार नाही असा सज्जड इशारा उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अजय देवरे यांनी दिला. रावेळी सभापती शंकर खेमनर, सचिव सतिष गुंजाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक विनय सरवदे उपस्थित होते.
दरम्यान कुरण येथील परिस्थिती तणावपूर्ण आहे. श्रीरामपूरचे अतिरीक्त पोलीस अधिक्षक रोहीदास पवार परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहे. कुरणच्या घटनेची दंगल सदृश्य परिस्थिती, पोलिसांना मारहाण व गावकर्‍यांनी दिलेल्या विविध मागण्यांच्या अर्जाची चौकशी होवून दोषींवर कारवाई करण्यात येईल अशी माहिती पवार यांनी दिली. या घटनेचा अधिक तपास उपविभागीय पालीस अधिकारी डॉ. अजय देवरे करीत आहे. कुठलाही अनुसिचत प्रकार घडू नये यासाठी जास्तीची पोलीस कुमक बोलविण्यात आली आहे.