Breaking News

शेतमाल तारण योजनेकडे बाजार समितीचे दुर्लक्ष!

जि.प.महिला व बालकल्याण समिती सभापती श्‍वेताताई महाले यांचा आरोप

बुलडाणा, दि. 29 - शेतकर्‍यांचा शेतमाल ज्यावेळी बाजारात येतो त्यावेळी बाजारात मोठ्या प्रमाणात शेतमालाची आवक झाल्यामुळे शेतकरी बांधवांच्या मालाची योग्य किंमत मिळत नाही ही बाब लक्षात घेऊन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  व सहकार, पणन मंत्री सुभाष देशमुख तथा बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री, कृषी मंत्री मा. ना. भाऊसाहेब फुंडकर यांनी शेतमाल तारण योजना अधिक व्यापक प्रमाणात राबविण्याचे आदेश दिले. परंतु चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीने सदर योजना ही प्रभावीपणे न राबविल्यामुळे शेतकरी बांधवांचे आर्थिक नुकसान झाले आहे, असा आरोप  महिला व बालकल्याण सभापती श्‍वेताताई महाले यांनी किन्हीसवडत येथे शुक्रवारी आयोजित शिवार संवाद यात्रेच्या दरम्यान केला.
यावेळी श्‍वेताताई महाले म्हणाल्या की, शेतकरी हिताचे समर्थन करणार्‍या आमदार राहुलभाउ बोंद्रे यांनी त्यांच्या ताब्यात असलेल्या चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीला शेतमाल तारण योजना राबविण्याबात सल्ला का दिला नाही असा प्रश्‍नही  उपस्थित होत आहे. शेतमाल तारण योजना शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची आहे. या योजनेअंतर्गत केवळ 3% टक्के दराने शेतकरी बांधवांना शेतीमालाच्या तारणावर कर्ज देण्यात येते. वेळेवर कर्ज मिळाल्याने शेतकरी बाधवांची तात्पुरती गरज भागवून ज्यावेळी शेतमालाला चांगली किंमत मिळेल त्यावेळी माल विकुन शेतकरी बाधवांना मदत होते. सावकारांच्या  पाशातून शेतकर्‍यांना मुक्त करणारी ही योजना चांगल्या प्रकारे किमान पुढील वर्षीतरी राबवावी, असेही आवाहन महाले यांनी केले.
चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीने यापुढे ही योजना राबविण्यात दुर्लक्ष केल्यास थेट कृषी मंत्री तथा पालकमंत्री ना.भाऊसाहेब फुंडकर व सहकार, पणन मंत्री ना. सुभाष देशमुख यांच्याकडे तक्रार करावी, असा सल्लाही उपस्थित शेतकरी बांधवांना दिला. भारतीय जनता पार्टीने सत्तेवर आल्यापासून आपत्तीग्रस्त शेतकर्‍यांना दिलेली मदत असो अथवा पिक विम्याची रक्कम किंवा धडक सिंचन विहिर योजनेसह एक नाही अनेक बाबतीत काँग्रस सरकारपेक्षा भरीव कामगिरी केली असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. यावेळी पंचायत समिती उपसभापती जितेंद्र कलंत्री, तालुका अध्यक्ष सुनील पोफळे, माजी तालुका अध्यक्ष संजय महाले, महादेव ठाकरे, राजकुमार राठी, गजानन चोपडे, गजानन आरज, लक्ष्मणराव रिंढे यांच्यासह असंख्य शेतकरी बांधव यावेळी उपस्थित होते.