Breaking News

नगरात 42 अंशावर तापमानाची नोंद; उकाड्याने नागरिक त्रस्त

अहमदनगर, दि. 29 - गेल्या अनेक दिवसांपासून वाढलेल्या तापमानाचा जनजीवनावर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. दुपारच्या वेळी शहरातील रस्ते निर्मनुष्य असल्याने एकप्रकारे अघोषित संचारबंदी असल्याचे पाहावयास मिळत आहे. चैत्राच्या उष्णतेने सध्या पारा 41 अंशाच्या पुढे गेला असून, अनेक आजारांना नागरिकांना तोंड देण्याची वेळ आली आहे. नगर शहरासह ग्रामीण भागात रुग्णांची संख्या वाढली आहे.
एप्रिल महिना निम्मा संपत आला असून मराठी वर्षातील चैत्र महिना उजेडला आले. चैत्र महिन्यातील उन्हाचा पारा चढलेला दिसून येतो. रस्त्यावरील गर्दी तुरळक किंवा काहीच नाही अशी अवस्था दिसून येत आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून आकाशातील सूर्य जणू काही आग ओकत आहे. त्यामुळे तापमानाचा पारा 41 अंशांच्या पुढे सरकरला आहे. प्रखर उन्हामुळे नागरिक दुपारच्यावेळी घराबाहेर पडण्याचे टाळत आहेत. त्यामुळे दिवसभर रस्त्यावर शुकशुकाट असतो. सकाळी व सायंकाळच्या वेळेत कामे उरकण्यात नागरिकांचा भर असल्याचे दिसून येत आहे. उन्हाच्या काहिलीपासून संरक्षण करण्यासाठी नागरिकांकडून ज्युस, ताक, लिंबू शरबत, यासह शीतपेयांचा आधार घेतला जात आहे. दरम्यान, दिवसभर कडक उन, रात्रीच्या वेळी दमट वातावरण आणि पहाटे हवेतील गारवा असे दिवसभरातील वातावरण आजाराला निमंत्रण ठरत आहे. हे वातावरण असह्य होत आहे. यामुळे हिवताप, डोकेदुखी, सर्दी, खोकला, पांढर्‍या पेशी कमी होणे, अशा आजारांच्या रूग्णांची संख्या वाढलेली आहे. शासकीय रूग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, मनपाचे दवाखाने यामध्ये व्यवस्थित उपचार मिळत नसल्याने या रूग्णांचा खासगी रूग्णालयांकडे जास्त ओढा आहे. त्यामुळे खासगी रूग्णालये रूग्णांच्या गर्दीने फुलून गेले आहेत.सरकारने निवडणुकीपूर्वी सांगितले होते की, अच्छे दिन येणार असे बतावणी केली होती. मात्र, काहीही असो मात्र आता थंड पेय विक्रेत्यांना उष्णतेच्या लाटेमुळे अच्छे दिन नक्कीच आल्याचे चित्र आहे. पाणीटंचाई त्यातच कडक उष्णता यामुळे थंड पाणी पिण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे. थंड बाटलीबंद पाणी विक्रेते व जारचे पाणीपुरवठा करण्यांना सध्या अच्छे दिन असून त्यांचा व्यवसाय तेजीत चालला आहे. दुकाने, कार्यालयात सर्रास जारच्या पाण्याचा वापर होताना दिसत असून एका जारसाठी 30 रूपये घेतले जातात. तर थंड पाण्याच्या एका बाटलीसाठी 20 रूपये मोजावे लागत आहेत.