Breaking News

सातारा जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेची सुचना आता एसमएसद्वारे

सातारा, दि. 24 (प्रतिनिधी) : सातारा जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभा, स्थायी समितीसह विविध समित्यांच्या सभा नेहमीच हेात असतात. मात्र त्या सभांची सदस्यांना प्रत्येकवेळी नोटीस मिळतेच असे नाही. अनेकदा दूरध्वनीवरुन ही माहिती द्यावी लागते. त्यात बदल करत आता सर्व सदस्यांना सभा तसेच कार्यक्रमांची माहिती एसएमएसद्वारे देण्याची योजना अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी सुरु केली आहे.
सर्वसाधारण सभा तीन महिन्यांतून एकदा, तर स्थायी, जलव्यस्थापन, बांधकाम, आरोग्य, महिला व बालकल्याण, शिक्षण, अर्थ, कृषी, पशुसंवर्धन समित्यांच्या बैठका महिन्यातून एकदा होत असतात. या बैठकांची पूर्वकल्पना, नोटीस किमान दहा ते बारा दिवस आधी द्यावी लागते. सर्वच सदस्य सातत्याने जिल्हा परिषदेत येत असतात असे नाही. त्यामुळे अनेकांना शासकीय यंत्रणेच्या माध्यमांतून सभेची नोटीस द्यावी लागते. या प्रक्रियेत उशीर होण्याचीही दाट शक्यता असते. त्यातून अनेकांना सभांचे निरोपही मिळत नसल्याच्या तक्रारी यापूर्वीही झाल्या आहेत. तसेच कार्यक्रमांची माहितीही पदाधिकारी, सदस्यांना मिळत नसते. त्यावर उपाय म्हणून जिल्हा परिषदेने एसएमएस पाठविण्याचे नियोजन केले आहे. संबंधित यंत्रणेवर सर्व जिल्हा परिषद सदस्यांच्या मोबाईल नंबरची नोंदणी केली जात आहे. त्यामुळे पुढील सभांपासून सर्व सदस्यांना सर्वसाधारण सभेसह विविध विषय समित्यांच्या सभा, इतर सभांची तारीख वेळ व माहिती एसएमएसद्वारे मिळणार आहे. अध्यक्ष संजीवराजेंच्या संकल्पनेतून ही सुविधा सुरु करण्यात आली आहे. अध्यक्षांचे स्वीय सहायक सुनील चतूर यांनी याबाबतचे पत्र सर्व सदस्यांना पाठविले आहे.