Breaking News

आशियाई विकास बँकेने विकसनशील देशांना प्राधान्य द्यावे - जेटली

योकोहामा, दि. 08 - आशियाई विकास बँकेने विकसनशील देशांच्या कल्पनांना प्राधान्य द्यावे , अशी विनंती केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज येथे  केले. आशिया विकास बँकेचे अध्यक्ष ताकेहिको नाकाओ यांच्यासोबत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. बँकेच्या गव्हर्नर मंडळाची बैठक घेण्यासाठी जेटली जपान  दौ-यावर आहेत. जेटली यांच्यासोबत अर्थ सचिव शक्तीकांत दास व अर्थ मंत्रालयाचे अन्य वरिष्ठ अधिकारीही उपस्थित आहेत. नाकाओ यांच्यासोबत झालेल्या  चर्चेत जेटली यांनी द्विपक्षीय संपर्काबाबत चर्चा केली.
भारत हा या बँकेचा सर्वांत मोठा ग्राहक असल्याबाबत जेटली यांनी समाधान व्यक्त केले. बँक विकसनशील देशांना सेवा देते. त्यामुळे त्यांनी या देशांच्या विचारांना  प्राथमिकता दिली पाहिजे, असेही जेटली म्हणाले.
या वेळी जपानचे अर्थमंत्री तारो असो यांच्यासोबतही जेटली यांची द्विपक्षीय बैठक झाली. जपानी कंपन्यांनी भारतात मेट्रो रेल्वे प्रकल्प उभारणीसाठी जेटली यांनी  निमंत्रित केले. जेटली व असो यांनी दोन्ही देशांतील वाढत्या सहकार्याचा उल्लेख करत द्विपक्षीय आर्थिक सहकार्य व विस्तारीकरण करण्यासाठी कटीबद्धता  दर्शवली.