Breaking News

नाशकात व्हर्च्युअल करन्सीमध्ये गुंतवणुकीस भाग पाडणा-या परदेशी नागरिकासह 5 जणांना अटक

नाशिक, दि. 22 - नाशिक शहरात व्हर्च्युअल करन्सीमध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडणा-या परदेशी नागरिकासह 5 जणांच्या टोळक्याला शहर पोलिसांनी अटक  केली आहे. त्यांच्या तपासातून याचे राज्यभर रॅकेट असल्याची खळबळजनक माहिती समोर येत आहे.
शहरातील तारांकित हॉटेल्समध्ये सेमिनार घेऊन बिट कॉईन या व्हर्च्युअल करन्सीच्या आर्थिक लाभाचे फायदे पटवून देत त्या माध्यमातून जादा परताव्याचे आमिष  दाखवून गुंतवणूकदारांची आर्थिक फसवणूक करणा-या परदेशी नागरिकांसह पाच जणांना सायबर पोलिसांनी काल अटक केली. सायबर पोलिसांच्या पथकाने सदरच्या  सेमिनारवर छापा टाकून 84 हजार रुपयांचे मोबाईल्स, 72 हजार रुपये किमतीचे बिट कॉईन्सचे लोगो, 22 हजार रुपयांची रोकड असा सुमारे पावणे दोन लाखांचा  मुद्देमाल जप्त केला आहे.
रोमजी बिन अहमद (47, रा. जलान इदाह-2, तमन सेताजी इदाह 08000, सुनगाई पेतानी, केदाह, मलेशिया) या परदेशी नागरिकासह निशेद महादेवजी वासनिक  (29, रा. वसिम प्राईड सोसायटी, आराधनानगर, दिघोरी, खर्बीरोड, नागपूर), अशिष शंकर शहारे (28, रा. गोरावती रेसिडेन्सी, कोपरगाव, जि. नगर), दिलीप  प्रेमदास बनसोड (29, रा. फाळके प्राईड अपार्टमेंट, पाथर्डी फाटा, नाशिक), कुलदीप लखू देसले (38, रा. सुरेश बापू प्लाझा, खुटवडनगर, नाशिक) अशी अटक  करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.
नाशिकसह राज्यातील, नागपूर, अहमदनगर आदी राज्यात बीट कॉईन खरेदी विक्रीचे जाळे पसरले आहे. या घोटाळ्याचा सूत्रधार मलेशियन नागरिक असल्याचे समोर  येत असून, घोटाळ्याची व्याप्ती शोधून काढण्याचा प्रयत्न सायबर पोलीस स्टेशनचे अधिकारी करीत आहेत. मुख्यत्वे अंडरवर्ल्डमध्ये ज्या व्हर्चुअल चलनाचा वापर  होतो, त्या चलनाचा भारतात प्रसार आणि प्रचार करण्याचा प्रयत्न हे टोळके करत होते.
या टोळीकडे केलेल्या चौकशीनुसार, सदर टोळीने नाशिकसह पुणे, नागपूर, अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथे अनेक बैठका घेतल्याचे समोर आले आहे. मल्टीलेव्हल  मार्केटींग पद्धतीने ही टोळी बीट कॉईनचा प्रसार करून गुंतवणूकदारांना गुंतवणूक करण्यासाठी उद्युक्त करीत असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. बीट कॉईन  हे इंटरनेटवरील चलन आहे. प्रत्यक्ष या चलनाचा वापर व्यवहारात होत नाही. भारतात तर अशा सर्वच व्यवहारांवर बंदी घालण्यात आली आहे.
ड्रग्ज अथवा अवैध वसा खरेदी विक्रीसाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर बीट कॉईनचा वापर केला जातो. नाशिकमध्ये जवळपास 150 गुंतवणुकदारांनी यात पैसे गुंतवले  आहे. तर, इतर ठिकाणांचा विचार करता हा आकडा सध्यातरी 500च्या घरात पोहोचला आहे. सध्या चौकशी सुरू असून, गुंतवणुकीचा एकूण आकडा समोर आलेले  नाही. मात्र, यात मोठे रॅकेट समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सेमीनारमध्ये आलेल्यांना सभासद नोंदणी फॉर्म, स्टीकर्स, माहिती पत्रिका, बोनस फॉर्म, लोगो आदि तयार करून सदरचा प्रकार खरा असल्याचे भासविण्याचा प्रयत्न  केला आणि मोठी आर्थिक फसवणूक करण्याचा प्रयत्न केला. फसवणूकप्रकरणी सायबर पोलिसांनी अटक केली आहे असून कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यात  आला आहे.