Breaking News

पथदर्शी आरोग्य पूर्व तपासणी मोहिमेत 5.77 लाख जणांची नोंदणी - गिरीष महाजन

मुंबई, दि. 26 - वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत राबविण्यात येणार्‍या पंडित दीनदयाल उपाध्याय स्वस्थ महाराष्ट्र अभियानाअंतर्गत राज्यातील सहा जिल्ह्यात  राबविण्यात येत असलेल्या पथदर्शी आरोग्य पूर्व तपासणी मोहिमेत काल सायंकाळपर्यंत सुमारे 5 .77 लाख लोकांनी नोंदणी केली असून त्यांची मोफत तपासणी  करण्यात येत आहे. सुमारे वीस हुन अधिक विविध आजारांची तपासणी यामध्ये करण्यात येत आहे. ही मोहीम येत्या 27 मे पर्यन्त सुरू राहणार आहे. या तपासणी  अभियानात जास्तीतजास्त नागरिकांनी नोंदणी करावी, असे आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी केले आहे. पंडित दीनदयाल उपाध्याय स्वस्थ महाराष्ट्र  अभियानांतर्गत नाशिक, पालघर, अकोला, बीड, चंद्रपूर व सांगली या सहा जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात 1 मे पासून पथदर्शी आरोग्य पूर्व तपासणी मोहिम राबविण्यात  सुरुवात झाली आहे. जास्तीतजास्त नागरिकांची तपासणी करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण आणि सार्वजनिक आरोग्य विभाग याच्या वतीने नियोजन करण्यात आले आहे.  यासाठी आतापर्यंत तीन ते चार वेळा संबंधित यंत्रणांची व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे वेळोवेळी सूचना देण्यात आल्या आहेत.
आरोग्यपूर्व तपासणी मोहिमेत सांगली जिल्ह्यात 2 लाख 55 हजार 596, बीड मध्ये 1 लाख 81 हजार 651, नाशिकमध्ये 62 हजार 060, चंद्रपूर मध्ये 35 हजार  721, अकोला मध्ये 29हजार 597, पालघरमध्ये 11 हजार 709 अशा एकूण 5 लाख 76 हजार 326 नागरिकांची काल सायंकाळपर्यंत तपासणी करण्यात आली  आहे. या मोहिमेत रुग्णांची विविध तपासणी मोफत करण्यात येणार असून या तपासणीत आढळलेल्या रोगांवर पुढील उपचार करण्यासाठी मार्गदर्शन व मदत करण्यात  येणार आहे. तसेच गरजू रुग्णांना शासकीय योजनांमधून उपचार करण्यात येणार आहेत. ज्यांना सध्याच्या योजनांमधून लाभ मिळू शकणार नाही, त्यांच्यासाठी  मुख्यमंत्री सहायता निधीतून त्या जिल्ह्याच्या ठिकाणीच उपचारासाठी मदत मिळण्यासाठीही सहकार्य करण्यात येणार आहे. तसेच सामाजिक संस्था, अशासकीय संस्था  व कंपन्यांच्या सामाजिक उत्तर दायित्व उपक्रमांचीही मदत घेण्यात येणार आहे. आरोग्य पूर्व तपासणी मोहिमेतील रुग्णांच्या आजारासंबंधी संशोधन करून त्यावर  कायमस्वरुपी उपाययोजना करण्यासाठी पावले उचलण्यात येणार असल्याचेही श्री. महाजन यांनी सांगितले. अंतीम टप्प्यात प्रत्येक जिल्ह्यात अभियानांतर्गत समन्वय  समितीचे सदस्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या सोबत समन्वयाने मोठ्या प्रमाणात गरजु रुग्णांना लाभ होण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन श्री.महाजन यांनी  केले आहे.