प्रेमविवाह केल्याने मुलीची निर्घुण हत्या
निमखेड येथील घटना ; 11 दिवसांपुर्वीच झाला होता प्रेमविवाह
बुलडाणा, दि. 06 - प्रेमविवाह करणार्या मुलीचा बापाने कुर्हाडीचे घाव घालत निर्घुण खुन केल्याची घटना दि. 5 एप्रिल रोजी दुपारी 1 वाजेदरम्यान मलकापूर तालुक्यातील निमखेडा येथे उघडकीस आली.याबाबत मिळालेल्या माहितीनुसार मनिषा वय 21 वर्ष व गणेश गजानन हिंगणे वय 27 वर्ष यांनी घरच्यांचा विरोध झुगारुन 11 दिवसांपुर्वी नोंदणी पध्दतीने प्रेमविवाह केला आणि भावि आयुष्यांच्या आनंदी स्वप्नात दोघेही रमेले. मात्र हा त्यांचा आनंद फार काळ टिकला नाही. आपल्या इच्छेविरुध्द मुलीने केलेला प्रेमविवाह बाबु रामा हिवरे यांच्या चांगलाच जिव्हारी लागला होता. त्यामुळे संधी मिळताच कुर्हाडीचे घाव घालून नवविवाहीत पोटच्या मुलीची त्यांनी निर्घुण हत्या केली.
तालुक्यातील निमखेडी गावातील गणेश हिंगणे हा एम.आर.म्हणून बुलडाणा येथे कार्यरत आहे. गणेश ह्याचे गावातच राहणार्या मनिषा हिच्यावर प्रेम होते. या प्रेमप्रकरणातुन दोघांनी नोंदणी पध्दतीने प्रेमविवाह केला. मात्र याचा प्रचंड राग मुलीचे वडिल बाबु रामा हिवरे यांना आलेला होता. दरम्यान घटनेच्या दिवशी म्हणजे आज 5 एप्रिल रोजी गणेश हा नियमीत पणे आपल्या नोकरीवर बुलडाणा येथे गेला होता. तसेच गणेशचे वडिल गजानन हिंगणे हे सुध्दा कामानिमित्त बोहर गेले होते. आई शेतात गेली होती. याच संधीचा फायदा घेत आरोपी वडिल बाबु रामा हिवरे हे मुलीच्या घरी आले. डोक्यात असलेला प्रचंड राग अनावर होत त्यांनी घरातच पोटच्या मुलीवर कुर्हाडीने सपासप वार केले आणि नुकत्याच वैवाहिक आयुष्यात पहिलेच पाऊल ठेवलेल्या आपल्या पोटच्या मुलीला संपविले. या हृदविदारक घटनेने संपुर्ण निमखेड सह मलकापूर तालुक्यात खळबळ उडाली आहे.
याबाबत गणेश गजानन हिंगणे यांच्या फिर्यादीवरुन आरोपी बाबु हिवरे यांस अटक करण्यात आली आहे. त्याच्याविरुध्द कलम 302 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास ठाणेदार अविनाश भामरे हे करीत आहेत.