Breaking News

शासकिय योजना व यंत्रज्ञानाचा अवलंब करुन दुग्धव्यसाय केल्यास नक्कीच लाभ

अहमदनगर, दि. 02 - दुग्ध व्यवसाय व दुध उत्पादन वाढीसाठी शासनाने नविन योजना आणल्या आहेत.नविन तंत्रज्ञान व शासनाच्या योजनांचा  योग्य अभ्यास दुध उत्पादकांनी केल्यास नक्कीच त्याचा लाभ होईल.दुध उत्पादन वाढ करताना उत्पादन खर्च कमी केल्यास दुध उत्पादकांना चांगले दिवस येतील असे प्रतिपादन ’नागवडे’ कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी केले.
पशुसंवर्धन विभागाच्या वतीने वांगदरी येथे कामधेनू दत्तक ग्राम योजनेच्या शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबीराचे उद्घाटन नागवडे यांचे हस्ते करण्यात आले.यावेळी बोलताना ते म्हणाले की, आपला देश कृषी प्रधान देश आहे.शेती ही आपली संस्कृती आहे.जगाचा अन्नदाता असलेला शेतकरी सध्या संकटात आहे.निसर्गाचा लहरीपणा,पाणी टंचाई यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे.शेतीला जोडधंदा करण्याशिवाय पर्याय राहीला नाही.दुध उत्पादन व कुक्कटपालन हे जोडधंदे शेतक-यांनी करणे काळाची गरज बनली आहे.आर्थिक उत्पन्न वाढीसाठी या व्यवसायांकडे गांभिर्याने पहावे लागेल असे सांगून ते म्हणाले की,सरकारच्या पशुसंवर्धन विभागाच्या अझोला,हायड्रोपोनिक्स,मुक्तगोठा,मुरघास अशा विविध योजना आहेत.या योजनांचा अभ्यासपूर्वक लाभ घेवून शेतकर्‍यांनी दुध व्यवसाय केल्यास निश्‍चितपणे लाभ होईल.
गोपालन ,शेळी - मेंढी पालन,कुक्कटपालन हे व्यवसाय करताना उत्पादन खर्च कमी करुनही दर्जेदार उत्पादन घेतल्यास शेतकर्‍यांना निश्‍चितपणे चांगले दिवस येतील.व शेतकर्‍यांचे जीवनमान उंचवण्यास मदत होईल असा विश्‍वास व्यक्त करुन नागवडे म्हणाले की,शेतक-यांनी केवळ शेती अन् शेती हे सूत्र बाजूला ठेवण्याची व शेती पुरक व्यवसाय केल्याशिवाय सामान्य शेतकर्‍यांची प्रगती होणार नाही.सामान्य माणूस,दुध उत्पादक व शेतकर्‍यांच्या मदतीसाठी आपण नेहमीच प्रयत्नशील राहीलो आहोत.यापुढेही शेतक-यांना मदत करण्यात कुठे कमी पडणार नाही अशी ग्वाही नागवडे यांनी दिली.
यावेळी बोलताना पंचायत समिती सदस्य जिजाबापू शिंदे यांनी भविष्यात शेतकर्‍यांनी नविन तंत्रज्ञान व पिकांच्या अधिक उत्पादन देणार्‍या नविन वाणांचा स्विकार करण्याची गरज व्यक्त केली.तसेच शेती पुरक व्यवसायांवर अधिक भर देण्याचे आवाहन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना पशुधन विकास अधिकारी डॉ.अरविंद उंडे यांनी शेतकर्‍यांना व पशुपालकांना शासनाच्या योजनांची सविस्तर माहीती देवून या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
यावेळी उपसरपंच महेश नागवडे,डॉ.शरद गोपाळे,डॉ.प्रशांत गुंजाळ यांची भाषणे झाली.कार्यक्रमाला माजी सरपंच दत्तात्रय मासाळ,संजय नागवडे,अशोक मासाळ,साहेबराव महारनूर,अशोकराव नागवडे,श्रीमंत मासाळ,संदिप नागवडे आदिंसह शेतकरी व दुध व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.