Breaking News

मशिदींवरील भोंग्यांमुळे माझी झोपमोड का? : सोनू निगम

मुंबई, दि. 17 - मी मुस्लीम नाही, तरी अजानमुळे माझी झोपमोड का?, असा सवाल करत, सुप्रसिद्ध गायक सोनू निगम यांनी मुस्लिम धर्माच्या अजानवर आक्षेप घेतला आहे. ट्विटरवरुन याबाबत मत व्यक्त केलं आहे.
मी मुस्लीम नाही आणि तरीही मला अजानच्या आवाजामुळे झोपेतून उठावं लागतं. भारतातील जबरदस्तीची ही धर्मिकता कधी संपेल?, असा सवाल सोनू निगम यांनी केला आहे. शिवाय, मोहम्मद यांनी ज्यावेळी इस्लामची सुरुवात केली, त्या काळात वीज नव्हती. मग एडिसननंतर हा कर्कश आवाज का?, असे सोनू निगम यांनी ट्वीटमधून विचारलं आहे. जे लोक धर्माचे अनुयायी नाहीत, त्यांना भोंगे लावून उठवणार्‍या कोणत्याही मंदिर किंवा गुरुद्वारावर माझा अजिबात विश्‍वास नाही., असेही सोनू निगम म्हणाले. दरम्यान, सोनू निगम यांचे ट्वीट आता सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत. काही जण सोनू निगम यांच्या मताशी सहमती दर्शवत आहेत, तर काही विरोध करुन टीकाही करत आहेत. त्यामुळे आता नवा वाद सुरु होण्याची चिन्ह आहेत.