Breaking News

भविष्याचा वेध ओळखून शिक्षण घेतले पाहिजे : सारंग पाटील

कराड, दि. 6 (प्रतिनिधी) : शिक्षण हे प्रत्येक व्यक्तिच्या आयुष्यातील महत्वाचा घटक आहे, स्पर्धेच्या युगात आपल्याला आपले अस्तित्व टिकवून धरायचे असेल तर भविष्याचा वेध ओळखून योग्य दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी प्रयत्नशिल राहिले पाहिजे तरच उद्याची पिढी शैक्षणिक समृध्दी निर्माण करेल, असा विश्‍वास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र राज्य माहिती व तंत्रज्ञान विभागाचे राज्य प्रमुख युवा नेते सारंग पाटील यांनी केले.
राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाश्‍चिम सुपने (चव्हाण मळा) या शाळेमध्ये 74 व्या संगणक संच वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सरपंच प्रविण थोरात, रयत सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक शिवाजीराव गायकवाड, खरेदी विक्री संघ कराड संचालक संपत सर्वे, शरद क्रीडा प्रतिष्ठान कराड तालुका अध्यक्ष अर्जुन कळंबे, माजी संचालक प्रकाश पाटील, उद्योजक सुनिल बामणे, तुकाराम घोडके, सज्जनराव यादव, मुख्याध्यापक गजानन वेल्हाळ उपस्थित होते.
सारंग पाटील म्हणाले, मुलांनी शिकले पाहिजे आणि पालंकानी त्यांना चांगले शिक्षण दिले पाहिजे ग्रामीण भागातील ही आमची मुले स्पर्धेच्या युगात टिकाव धरणार का ही नुसती काळजी पालकांनी करुन उपयोगाची नाही तर समाज म्हणून आपण त्यांच्याकडे पहाण्याचा त्याना दर्जेदार शिक्षण मिळणेसाठी सुविधा उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ग्रामीण व शहरी भागतील विद्यार्थ्यांच्या बुध्दीमध्ये फरक नाही फरक आहे तो आपण उपलब्ध करुन दिलेल्या दर्जेदार शैक्षणिक सुविधांचा असल्याचे सांगून ते पुढे म्हणाले गावाचा विकास म्हणजे आपल्याकडे रस्ते, समाज मंदीर, गटर्स बांधणे म्हणजे विकास ही संकल्पना निर्माण झाली आहे परंतू अविरत विकास म्हणजे नवीन पिढीला चांगले दार्जैदार शिक्षण देणे त्यांना योग्य त्या शिक्षणाच्या संधी योग्य वेळेला उपलब्ध करुन देणे हा खरा विकास त्यांचा विकास तर घराचा, गावाचा किंबहुना आपल्या देशाचा विकास होईल.
ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना अद्यावत शिक्षण घेणेसाठी काय आवश्यक आहे हे सारंग पाटील यांच्या सनबीम एज्युकेशन ट्रस्टने ओळखले आहे मिळालेल्या संगणकामुळे ग्रामीण भागातील मुलांचा पाया भक्कम होणार आहे. उपक्रम कौतुकास्पद असून यातून आपण समाजसाठी काहीतरी नावीन्य करुन आदर्श निर्माण करण्याची प्रेरणा मिळेल, असे मत शरद क्रीडा प्रतिष्ठान कराड तालुका अध्यक्ष अर्जुन कळंबे यांनी मांडले.
प्रारंभी स्वागत मुख्याध्यापक गजानन वेल्हाळ यांनी केले व प्रास्ताविक सौ. लतिका मोरे यांनी केले तर आभार सरपंच प्रविण थोरात यांनी मानले. कार्यक्रमास पोलीस पाटील सागर चव्हाण, महिला बचत गट अध्यक्षा सौ. संगिता कळंबे, सुषमा कळंबे, भारती कळंबे, कोमल कळंबे, संजय चव्हाण, हिम्मतराव थोरात, शंकर चव्हाण, सतिश चव्हाण, आनंदराव चव्हाण, राजेंद्र चव्हाण, दिलीप कळंबे, आनंदराव कळंबे, ग्रामस्थ, विद्यार्थी, पालक व शिक्षक उपस्थित होते.